Konkan News – परशुराम घाटात गॅबियन वॉलचे काम अंतिम टप्प्यात; पावसाळ्यापूर्वी महामार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची घाई
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणांतर्गत चिपळूण हद्दीत प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या विविध कामांना आता वेग आला आहे.या अंतर्गत कोकणातील अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या परशुराम घाटात गॅबियन वॉलचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून ते अतिशय वेगाने सुरू आहे. आगामी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची आणि कंत्राटदार कंपनीची मोठी घाई सुरू झाली आहे.
या महामार्ग चौपदरीकरणाचे काम चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यांत दोन वेगवेगळ्या कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र घाटाची तोडफोड सुरू झाल्यापासून या कामात अनेक तांत्रिक व नैसर्गिक विघ्ने येत गेली आहेत. काम सुरू असताना वारंवार दरडी कोसळल्यामुळे घाटात बांधण्यात आलेल्या अनेक संरक्षक भिंती नेहमीच धोक्यात राहिल्या होत्या,तसेच डोंगरातून दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात सातत्याने घडत असल्यामुळे अखेर केंद्र सरकारकडून यावर उपाय शोधण्यासाठी टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती.
गतवर्षी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन कंत्राटदार कंपनीने केले होते,मात्र मे महिन्याच्या मध्यावर अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील कामाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले होते.अर्धवट स्थितीत असलेली गॅबियन वॉल कोसळल्या मुळे महामार्ग विभागाने सर्व कामे थांबवून केवळ एकेरी वाहतूक सुरू ठेवली होती. पावसाळ्यानंतर गॅबियन वॉलच्या रचनेत काही किरकोळ आणि महत्त्वाचे बदल करून पुन्हा वेगाने काम सुरू करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण येथील अधिकारी पंकज गोसावी यांनी माहिती दिली की,परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल. पाण्याच्या नैसर्गिक मार्गावर व झऱ्यांच्या ठिकाणी पाईप टाकून पावसाळ्यात पाणी सहजपणे वाहून जाईल अशी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली असून, यामुळे या मार्गावरील प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे. सध्या परशुराम घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले करण्यात आले असून,उर्वरित कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्याच्या दृष्टीने महामार्ग पूर्वपदावर आणण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व कंत्राटदार कंपनीने केले आहे.
Comments are closed.