घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ; अंबादास दानवे यांनी केला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कामाचा पंचनामा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप सत्तेवर येऊन शंभर दिवस झाले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधानपरिषेदतील आमदार अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांच्या शंभर दिवसांच्या कामाचा पंचनामाच सोशल मीडियावर मांडला आहे. X वर एक मोठी पोस्ट शेअर करत त्यांनी ​सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची उदाहरणे सादर केली आहेत.

” छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या १०० दिवसांच्या ‘कारभाराचा’ हा जाहीर पंचनामा! घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही”, असे अंबादास दानवे यांनी या पोस्टमधून म्हटले आहे.

​सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची अंबादास दानवे यांनी दिलेली उदाहरणे खालील प्रमाणे –

१. हेरिटेज वॉकचा सपशेल खोटा दावा: महापालिकेने स्वतः ‘हेरिटेज वॉक’ सुरू केल्याचे सांगतात. मात्र हे वॉक सुमारे दहा वर्षांपासून शहरात सुरू आहेत. महापालिका त्यात जाऊन बसली एवढंच!

२. पाणीप्रश्न अधिक बिकट, नागरिक टँकरच्या विळख्यात: पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतरही नागरिकांना हक्काचे पाणी मिळेना. ५-६ दिवसांऐवजी आता थेट महिन्यातून अवघे ३ (१२० मिनिटे सारासरी) वेळा पाणी मिळत असल्याने संपूर्ण शहर पाण्यासाठी वणवण भटकत आहे.

३. आरोग्याशी क्रूर खेळ: पडेगाव कचरा डेपोला लागलेली आग आणि धुराच्या विळख्यामुळे परिसरातील नागरिकांचे, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना आपली घरे विकण्याची वेळ आली आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि निष्क्रीय महापौर सुस्त बसून आहेत.

४. मान्सूनपूर्व कामांचे वाटोळे: पावसाळा दारावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे रखडलेलीच आहेत. आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे.

५. सामान्यांचे मरण, पदाधिकाऱ्यांची चंगळ: सर्वसामान्य छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे पारंपरिक रविवार, शुक्रवार आणि पीर बाजार बंद करण्याचा निर्णय केवळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी घेण्यात आला आहे. एकीकडे मनपा १२०० कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली असताना, दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या चैनीसाठी आलिशान ई-कार खरेदीचा घाट घातला जात आहे. जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टी आहे!

​६. केवळ ‘सिटी ट्रान्सफॉर्मेशन’ आणि ‘२०४७ चे व्हिजन’ अशा कागदी आणि चकचकीत घोषणा करून शहराचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. भाजपचा हा १०० दिवसांचा कार्यकाळ शहराला प्रगतीऐवजी अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे!

Comments are closed.