मोठ्याने सॉरी म्हणा…सलमान खानचा पॅपराजींना टोला
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलसमोर पॅपराजींवर संताप व्यक्त केल्यानंतर आता सलमानचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये सलमानने पॅपराजींना फटकारल्यानंतरही मोठेपणा दाखवत त्यांना माफ केले. मंगळवारी रात्री उशिरा सलमान खान हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. त्याला पाहताच तिथे उपस्थित पॅपराजींनी मोठमोठ्याने “भाई… भाई…” अशी आरोळी देण्यास सुरुवात केली. हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या गोंधळामुळे सलमान संतापला. त्याने फोटोग्राफर्सना सुनावत, “तुमच्या कुटुंबातील कोणी हॉस्पिटलमध्ये असते, तर तुम्ही असाच गोंधळ घातला असता का?” असा सवाल केला होता.
या घटनेनंतर सलमानने पोस्ट शेअर करत आपली नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे भाईजान आणि पॅपराजीं यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. मात्र, बुधवारी रात्री ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये चित्र वेगळेच पाहायला मिळाले. सलमान खान कार्यक्रमस्थळी पोहोचताच पॅपराजींनी त्याची माफी मागितली. “भाईजान, कालच्या प्रकाराबद्दल सॉरी,” असे एक फोटोग्राफर म्हणाला, तर दुसऱ्याने “भाईजान, आमचे तुमच्यावर प्रेम आहे,” असे म्हणाला.. असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.
यावेळी सलमाननेही हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिक्रिया दिली. “मोठ्याने बोला, मला तुमचं काही ऐकू येत नाहीये,” असे म्हणत त्याने वातावरण हलके केले. त्याचवेळी अभिनेता रितेश देशमुख तिथे पोहोचला. सलमान आणि रितेश यांनी एकमेकांना मिठी मारत पॅपराजींना पोज दिल्या. या संपूर्ण प्रकारानंतर सलमानचा शांत आणि मोठेपणा दाखवणारा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी भाईजानच्या संयमी भूमिकेचे कौतुक केले.
Comments are closed.