मोहनलालच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात केली आहे. 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15 कोटीपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. ‘दृश्यम’ चित्रपटाचे पहिले दोन भाग प्रचंड गाजल्यानंतर तिसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. रिलीजपूर्वीच चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. आता थिएटरमध्येही प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, रात्रीपर्यंत चित्रपटाने सुमारे 15.85 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये मल्याळम भाषेतील कमाई सर्वाधिक असून चित्रपटाने 13.70 कोटी रुपये जमा केले. याशिवाय तेलुगू भाषेत 1.50 कोटी, तमिळमध्ये 45 लाख आणि कन्नडमध्ये 20 लाख रुपयांची कमाई झाली. देशांतर्गतच नव्हे तर परदेशी बाजारपेठेतही ‘दृश्यम 3’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाची परदेशात 22 कोटी रुपयांहून अधिक प्री-सेल झाली होती. तसेच जगभरातील अॅडव्हान्स बुकिंगमधून जवळपास 48 कोटी रुपयांची विक्री झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपट जागतिक स्तरावर 50 कोटी रुपयांचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.असे वृत्त एबीपी न्यूज ने दिले आहे.

चित्रपटातील रहस्य, थरार आणि भावनिक कथानक प्रेक्षकांना पुन्हा एकदा खिळवून ठेवत आहे. जॉर्जकुट्टी आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरणारी कथा यावेळी आणखी उत्कंठावर्धक पद्धतीने मांडण्यात आली आहे. विशेषतः चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना मोठा धक्का देणारा असल्याचे बोलले जात आहे.मोहनलाल यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाला अधिक वजन प्राप्त झाले आहे. ‘दृश्यम 3’च्या दमदार सुरुवातीमुळे हा चित्रपट येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करू शकतो, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत रंगली आहे.

Comments are closed.