यो-यो चॅलेंज! मनप्रीतचं विराट-आरसीबीला थेट आव्हान, कारण काय?
हिंदुस्थान हॉकी संघाचा माजी कर्णधार मनप्रीत सिंग याने विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला यो-यो टेस्टसाठी खुले आव्हान दिले आहे. दोन्ही संघांनी एकत्र फिटनेस सेशन केल्यास क्रीडाजगतासाठी तो एक खास क्षण ठरेल, असे मत त्याने व्यक्त केले. “आम्ही विराट आणि RCB संघाला आमच्यासोबत ट्रेनिंगसाठी बोलवू इच्छितो. एकमेकांविरुद्ध स्पर्धा झाली तर हॉकीलाही फायदा होईल,” असे मनप्रीत म्हणाला.
RevSportz शी बोलताना त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. मनप्रीतने क्रिकेटमधील आव्हानेही मान्य केली. 150 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या चेंडूचा सामना करणे सोपे नसल्याचे तो म्हणाला. “जर आम्हाला फलंदाजी करायला सांगितली, तर ते आमच्यासाठीही कठीणच ठरेल. क्रिकेटमध्ये रिअॅक्शन टाइम, डोळ्यांचा समन्वय आणि योग्य पोझिशनिंग खूप महत्त्वाचे असते,” असे त्याने स्पष्ट केले.
दरम्यान, या चर्चेला सुरुवात विराट कोहलीच्या वक्तव्यामुळे झाली होती. कोहलीने हिंदुस्थान हॉकी खेळाडूंच्या फिटनेसचे कौतुक करत क्रिकेटपटू त्यांच्यापेक्षा खूप मागे असल्याचे सांगितले होते. “आम्ही त्यांच्या फिटनेसच्या 15 टक्केही नाही,” असे कोहलीने म्हटले होते. या वक्तव्यानंतर आता मनप्रीत आणि कोहली यांच्यातील संभाव्य यो-यो चॅलेंज पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Comments are closed.