Video – सुसाट मेट्रोत ‘चिंब चिंब’ प्रवास; पहिल्याच पावसात पुणे मेट्रोला गळती, प्रवाशांचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वळिवाच्या पावसाने शुक्रवारी पुण्याला झोडपून काढले. वादळी आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दुसरीकडे पहिल्याच पावसामुळे पुणे मेट्रोमध्ये गळती झाल्याचेही दिसून आले. यामुळे प्रवासांचे प्रचंड हाल झाले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी मेट्रो प्रशासनावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे पिंपरी-चिंचवडमधील ‘पिंपरी ते स्वारगेट’ या पर्पल लाईनवरील मेट्रोच्या एका पॅसेंजर कोचमध्ये गळती सुरू झाले. मेट्रोतील एका प्रवाशाने याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये कोचमधून गळणाऱ्या पाण्यापासून प्रवासी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी उद्धाटन झालेल्या मेट्रोच्या छतातून पावसाचे पाणी कसे काय गळू शकते? असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणेकर उन्हाचा चटका आणि ढगाळ हवामान अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव घेत होते. मात्र, शुक्रवार सकाळपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. दुपारी दोननंतर जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे काही वेळातच रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील सखल भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना गाड्या चालवताना तारेवरची कसरत करावी. काही ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

कुठे किती पाऊस?

चिंचवड – 60 मिलिमीटर
डुडुळगाव – 38 मिलिमीटर
हडपसर – 37.5 मिलिमीटर
शिरूर – 35.5 मिलिमीटर
एनडीए – 29.5 मिलिमीटर
आंबेगाव – 28 मिलिमीटर
राजगुरूनगर – 27 मिलिमीटर
भूगाव – 21 मिलिमीटर
शिवाजीनगर 13.1 मिलिमीटर
पाषाण – 13 मिलिमीटर
चार दिवस ढगाळ वातावरण

पुणे शहरातील कमाल तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाली. शुकवारी शहरात 37 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. पुणे शहरासह जिल्ह्यात 23 ते 28 मे या कालावधीत हवामान दुपारनंतर अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Comments are closed.