डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेकीच्या हत्येचा कट उधळला; इराणच्या अल-सादीला तुर्कीयेत बेड्या, कशाचा बदला घेणार होता?
अमेरिका आणि इराणमधील युद्धावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे काम सुरू असताना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि माजी सल्लागार इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे.
इराणच्या इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून प्रशिक्षण घेतलेल्या कमांडरने इवांका यांच्या हत्येची योजना आखली होती. ‘द न्यूयॉर्क पोस्ट’ने याबाबत वृत्त दिले आहे. या प्रकरणी मोहम्मद बकीर साद दाऊद अल-सादी (वय 32) या तरुणाला 15 मे रोजी तुर्कीयेमध्ये अटक करण्यात आली असून पुढील खटल्यासाठी त्याला अमेरिकेकडेही सोपवण्यात आले आहे. हा प्रकार समोर येताच जगभरात खळबळ उडाली आहे.
मोहम्मद अल-सादी हा इराणची अत्यंत शक्तिशाली लष्करी संघटना इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स आणि कताइब हिजबुल्लाह या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेने बगदाद विमानतळाजवळ केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणचे तत्कालीन कुड्स फोर्सचे प्रमुख जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केले होते. अल-सादी हा सुलेमानी यांना आपला गुरू आणि पितृतुल्य मानत होता. या हत्येचा बदला घेण्यासाठीच अल-सादीने इवांका ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचे ठरवले होते.
ट्रम्प यांनी आमचे घर उद्ध्वस्त केले आहे. आता बदला घेण्यासाठी आपल्याला इवांकाला मारून ट्रम्प यांचे घर जाळावे लागेल, असे अल-सादी आपल्या साथिदारांना उघडपणे सांगायचा. इराकी दूतावासाचे माजी लष्करी अधिकारी अंतिफाध कानबार यांनी याबाबत माहिती दिली. तसेच अल-सादी केवळ धमक्या देत नव्हता तर त्याने या कटाची पूर्ण अंमलबजावणी सुरू केली होती. त्याच्या अटकेच्या वेळी तपास यंत्रणांना धक्कादायक पुरावे मिळाले आहेत.
अल-सादीच्या ताब्यातून इवांका ट्रम्प यांच्या फ्लोरिडामधील 24 दशलक्ष डॉलर्सच्या आलिशान घराचा संपूर्ण अंतर्गत नकाशा जप्त करण्यात आला आहे. तसेच 2021 मध्ये त्याने एक्सवर इवांका यांच्या घराच्या परिसराचा नकाशा पोस्ट करत अरबी भाषेत धमकी दिली होती. बदला घेणे हा केवळ वेळेचा खेळ आहे. अमेरिकेच्या लोकांनी हे समजून घ्यावे की केवळ मोठ्या सुरक्षा व्यवस्थेने आणि सीक्रेट सर्व्हिसमुळे ते सुरक्षित राहणार नाहीत. आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून आहोत आणि योग्य वेळ आल्यावर सूड घेतला जाईल, अशी धमकी त्याने दिली होती.
Comments are closed.