‘अच्छे दिन’च्या नावाखाली देशभरातील झुरळांची जिरवण्याचं काम सुरू; इंधन दरवाढीवरून रोहित पवारांचा मोदी सरकारला टोला

देशात सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “देशात पेट्रोल-डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर तीन-चार दिवसांनी लिटरमागे 1-1 रुपयांनी वाढत आहेत, असा टोला लगावत रोहित पवारांनी लगावला. तसचे आगामी काळात पेट्रोल थेट 50 रुपयांनी महागण्याची भीती व्यक्त त्यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून सरकारवर टीकास्त्र सोडताना ‘अच्छे दिन’च्या घोषणेची आठवण करून दिली. सुरुवातीला टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचा प्रयोग झाला. आता मात्र परदेशात फिरू नका, पेट्रोल-डिझेल वाचवा, सोनं खरेदी करू नका, तेल खाऊ नका असं लोकांना सांगणारं स्वातंत्र्यानंतरचं हे पहिलं ‘दैदिप्यमान’ कामगिरी करणारं सरकार ठरलं आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

इंधनाच्या वाढत्या किमतींवर चिंता व्यक्त करताना त्यांनी उपरोधिकपणे म्हटले की, पुढील काही दिवसांत मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर 50 रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही. शिवाय 50 रुपये वाढ झाली म्हणून तुम्हाला कुणी 1 लिटर पेट्रोल-डिझेल गिफ्टही देणार नाही. उलट पंपावर तासनतास रांगेत उभं राहूनही इंधन मिळेलच याचीही आता खात्री राहिलेली नाही.

महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेल पाठोपाठ CNG ही महागला, रिक्षा-टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता

‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या या सरकारने देशभरातील झुरळांची अशा प्रकारे जिरवण्याचं काम सुरु केलंय, पण त्रस्त झुरळं आता संघटीत होत असून सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे, असा इशाराही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

जाणीवूर्वक वंचित ठेवलं जातंय का?

राज्यभरात विशेषतः मराठवाडा, विदर्भ, खान्देशात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून शेतीच्या मशागतीची कामे पूर्णतः खोळंबली आहेत. 10-15 तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सर्वाधिक तक्रारीचे फोन याच भागातून येत आहेत. या भागातल्या लोकांना जाणीवूर्वक वंचित ठेवले जात आहे का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. तसेच साठेबाजी करायला शेतकऱ्यांना डिझेल काही फुकट मिळत नाही आणि 15 तास लाईनमध्ये उभे राहायला त्यांच्याकडे वेळ देखील नाही. आगाऊ रक्कम भरूनही पेट्रोलपंप चालकांना डिझेल मिळतच नसल्याने पेट्रोलपंप चालकांना निर्देश देऊन समस्या कशी सुटणार? समस्येचे मूळ suply chain मध्ये आहे. त्यामुळं सरकारने केंद्राकडून वेळेत आणि पुरेसा इंधन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Comments are closed.