खर्डीतील क्रीडा संकुल लालफितीत, सातबारा नावावर होऊन दीड वर्ष उलटले
खर्डीतील क्रीडा संकुल लालफितीत अडकले आहे. क्रीडा संकुलाच्या जागेचा सातबारा दीड वर्षापूर्वी नावावर झाला असला तरी अद्यापपर्यंत एक वीटही रचली गेलेली नाही. संबंधित अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी अतिक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोकळ्या जागेची मोजणी करून संरक्षक भिंत बांधावी जेणे करून अतिक्रमण होणार नाही, अशी मागणी स्थानिक तरुण क्रीडाप्रेमींनी केली आहे.
खर्डी येथे २०१५ ला क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले. त्यासाठी महसूल विभागाने खर्डी ग्रामीण रुग्णालयासमोर सात एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते. नंतर जानेवारी २०१६ मध्ये जिल्हाधिकार्यांनी ७ एकर जागा क्रीडा संकुलाला देण्याबाबतचा प्रस्ताव बनवण्याच्या सूचना शहापूरच्या तहसीलदारांना दिल्या होत्या. तब्बल आठ वर्षानंतर फेब्रुवारी ५ एकर (२ हेक्टर) जागा जिल्हा क्रीडा व तालुका क्रीडा अधिकारी यांच्या नावे करण्यात आली. जमिनीचा सातबारा नावावर होऊन दीड वर्ष उलटले तरी क्रीडा संकुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मोकळ्या जागेवर अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. क्रीडा संकुलाचा कृती आराखडा बनवण्याचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू असल्याचे संबंधित क्रीडा अधिकारी सांगतात.
बेकायदेशीर बांधकामांना पेव
खर्डी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने क्रीडा संकुल परिसरातील गुणवंत खेळाडूंना प्रॅक्टिससाठी ये-जा करण्यास सोयीस्कर ठरणार आहे. क्रीडा संकुलाचे काम सुरू होत नसल्याने याठिकाणी बेकायदा बांधकामांना पेव फुटले आहे. महसूल विभाग आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याने येथे मोठी बेकायदा वस्ती तयार झाली आहे. अतिक्रमणे रोखण्यासाठी संरक्षक भिंतही बांधली जात नसल्याने खेळाडू संताप व्यक्त करत आहेत.
“खर्डीत क्रीडा संकुलाचा सातबारा नावावर होऊन दीड वर्ष होत आले. मात्र क्रीडा संकुल होण्याबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाने येथील आदिवासी, गुणवंत खेळाडूंसाठी लवकरात लवकर क्रीडा संकुलाची निर्मिती करावी.”
– फरासक मेघन, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
Comments are closed.