Cold Water Side Effects : फ्रिजचं गार पाणी आरोग्यासाठी कितपत धोकादायक?
उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यानंतर अनेक जण थेट फ्रिजमधील थंड पाणी पितात. त्या क्षणी शरीराला आराम मिळतो, पण हीच सवय हळूहळू आरोग्यावर परिणाम करू शकते, असं तज्ज्ञ सांगतात. विशेषतः पचनसंस्था, घसा आणि रक्ताभिसरणावर अतिथंड पाण्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
पचनक्रियेवर होतो परिणाम
आपल्या शरीराचं तापमान आणि फ्रिजच्या पाण्याचं तापमान यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे अतिथंड पाणी पिल्यानंतर शरीराला ते संतुलित करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. विशेषतः जेवणानंतर लगेच गार पाणी पिल्यास अपचन, गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्या वाढू शकतात. त्याचबरोबर, सतत थंड पाणी पिणाऱ्यांमध्ये घसा खवखवणे, कफ होणे किंवा सर्दी होण्याच्या तक्रारी जास्त दिसून येतात. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी अतिथंड पाणी शक्यतो टाळावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
अचानक थंड पाणी पिणं धोकादायक
कडक उन्हातून आल्यावर किंवा व्यायामानंतर लगेच फ्रिजचं पाणी पिल्यास शरीराला तापमानातील बदल सहन करावा लागतो. त्यामुळे काहींना डोकेदुखी, चक्कर किंवा थकवा जाणवू शकतो.
कोणतं पाणी योग्य
तज्ज्ञांच्या मते, सामान्य तापमानाचं किंवा किंचित कोमट पाणी शरीरासाठी अधिक फायदेशीर असतं. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि शरीरावर अतिरिक्त ताण येत नाही.
Comments are closed.