आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली

पुणे आळंदी मंदिर दानपेटीतील पैसे चोरी प्रकरण पुणे : देवाच्या आळंदीतील माऊलींच्या दानपेटीवर सेवेकऱ्याने डल्ला मारला. त्या विशाल वारुळे नामक सेवेकऱ्याच्या घरात रोकड सापडली आहे. 10, 20, 50 आणि शंभर रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये तब्बल पावणे चार लाख रुपये जप्त करण्यात आलेत. दानपेटीतील रक्कम जमा करताना विशाल हातचलाखी करायचा आणि एका पिशवीमध्ये नोटा भरायचा. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरु होता, असा अंदाज वर्तवला जातोय. ज्या दिवशी नोटांनी भरलेली पिशवी घरी घेऊन जायचा, त्या दिवशी विशाल मंदिरातील काही हार घरी घेऊन जातो. असं म्हणायचा आणि पिशवीत हार दिसतील असे ठेवायचा, खाली मात्र रोकड असायची. घरी आल्यावर रोकड मोजायचा आणि नंतर ती पिशवी आहे तशी बेडमध्ये ठेऊन द्यायचा. त्याचं पिशव्यांमध्ये पावणे तीन लाखांची ही रोकड आढळली. गेल्या तीन महिन्यांपासून तो दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि ती मोजून ठेवणे, हे काम करत होता.

विशाल मंदिरात कसा आणि कधी आला?

विशाल वर्षभरापूर्वी मंदिरात आला, तिथं भोजनालायतील आचाऱ्याला भेटला. मी जुन्नर तालुक्यातील वारुळेवाडी गावातून आलोय, माझा केटरिंगचा व्यवसाय आहे. मला माऊलींची सेवा करायची आहे, मला अन्नदान छत्रातून सेवा करण्याची संधी द्या. असं म्हणून त्याने सर्वप्रथम आचाऱ्याला विश्वासात घेतलं. इथं तो भाविक-भक्तांना सेवा द्यायला लागला. पाच-सहा दिवस तो इथं काम करायचा आणि मध्येचं गायब व्हायचा. परत काही दिवसांनी यायचा आणि मंदिरात सेवा द्यायचा. ही सेवा देता-देता त्याने इतर सेवेकारांच्या मदतीने मंदिरातील अनेकांशी ओळख निर्माण केली.

विश्वास संपादन करण्यासाठी विशालने काय केलं?

पाच-सहा महिन्यांपूर्वी त्याने मंदिरातील कॅशियरशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. कॅशियरची कामं ऐकू लागला. स्वतः किती प्रामाणिक आहे, हे दिसेल अशी कृती करु लागला. कॅशियरची इतर कामं हलकी होऊ लागली. अशा रीतीने हळूहळू कॅशियरच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला. मग तीन महिन्यांपूर्वी कॅशियरने त्याला दानपेटीतील रक्कम जमा करण्याच्या कामात दाखल करुन घेतलं. अलीकडच्या काही दिवसांपासून कॅशियर, सुरक्षारक्षक आणि सेवेकरी म्हणून विशाल असे तिघेचं दानपेटी खोलायचे.

अनेक दानपेट्या असल्यानं प्रत्येकावर वेगवेगळ्या दानपेट्या खोलण्याची आणि रक्कम जमा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. विशालला जे अपेक्षित होतं, ते घडू लागलं. मग गेल्या वर्षभरात विशालने जो विश्वास निर्माण केला होता, त्याचा गैरफायदा घ्यायला त्याने सुरुवात केली. दानपेटी खोलली की बादलीत रक्कम भरता-भरता तो काही रक्कम त्याने आणलेल्या पिशवीत भरु लागला. कॅशियरकडे बादली सोपवणे आणि सर्व रक्कम जमा करुन होईपर्यंत तो पिशवीत भरलेली रक्कम घरी घेऊन जायचं नियोजन करायचा. यासाठी मंदिरातील काही हार घरी घेऊन जातो, असा बहाणा तो करायचा. ते हार पिशवीत दिसतील असे ठेवायचा, खाली मात्र रोकड असायची. ही हातचलाखी तो गेल्या काही दिवसांपासून करत राहिला.

सीसीटीव्हीने बिंग फोडलं

तीन-चार दिवसांपूर्वी मात्र सीसीटीव्हीच्या स्क्रिनसमोर बसलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या हालचालींवरील संशय आला. मग त्याने दोन दिवस निरखून पाहिले, ही बाब देवस्थानच्या कानावर घातली. देवस्थानने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आणि विशालचे बिंग फुटले. आजवर त्याने ज्या पिशव्यांमध्ये रक्कम चोरुन नेहली, त्या सर्व पिशव्या रोकडसह जप्त करण्यात आल्या. ती रोकड मोजली असता पावणे चार लाख रुपये आढळले आहेत. बरीचं रक्कम त्याने खर्च ही केलीये, काही ठिकामी रक्कम गुंतवल्याची चर्चा ही सुरुये. जुन्नर तालुक्यात त्याने असे काही उद्योग केल्याचं बोललं जातंय. या सर्व अनुषंगाने आळंदी पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आहेत.

आळंदी देवस्थानच्या कार्यपद्धतीवर प्रश्न?

विशालने हे एकट्यानं केलंय की मंदिरातील आणखी कोणाचं त्याला पाठबळ होतं? याचा तपास करण्याची ही गरज आहे. कारण याआधी ही माऊलींच्या चरणी अर्पण झालेल्या रकमेवर डल्ला मारण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं आहे. मात्र बदनामी होऊ नये म्हणून देवस्थानकडून अशा घटनांवर पडदा टाकण्याचं काम होत आलंय, अशी चर्चा नेहमीचं होते. यानिमित्ताने देवस्थानच्या कार्यपद्धतीवर प्रश्न ही उपस्थित होत आलेत. वेळोवेळी घडणारी ही चुकीची चर्चा थांबवायची असेल तर देवस्थानने याप्रकरणाच्या निमित्ताने इतर बाबींवर प्रकाश टाकायला हवा. शेवटी भाविक-भक्तांच्या श्रद्धेशी खेळण्याचा अधिकार माऊलींनी कोणालाचं दिला नाही, हे कोणी विसरता कामा नये.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.