फक्त 3 मॅच बाकी, आता मुंबई इंडियन्स ठरणार 4 संघांचं भवितव्य! आयपीएलच्या प्लेऑफचं चक्रावणारं समी

IPL 2026 प्लेऑफ पात्रता परिस्थिती: आयपीएल 2026 चं प्लेऑफ चित्र जवळपास स्पष्ट झालं असलं, तरी चौथ्या जागेसाठी अजूनही जबरदस्त रणधुमाळी सुरू आहे. तीन संघांनी प्लेऑफमध्ये धडक मारली असून आता उरलेल्या एका तिकिटासाठी पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जीवघेणी स्पर्धा रंगली आहे. पुढील दोन दिवसांत या थराराचा शेवट होणार आहे.

पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांवर राहिल्यामुळे दोन्ही संघांना थेट क्वालिफायर-1 मध्ये प्रवेश मिळाला. तर तिसऱ्या स्थानावर असलेला सनरायझर्स हैदराबाद एलिमिनेटरमध्ये पोहोचला आहे. 26 मेपासून प्लेऑफला सुरुवात होणार असून 31 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. लीग स्टेजमध्ये फक्त 3 सामने बाकी आहेत, पण चौथ्या जागेसाठीचं गणित मात्र फारच गुंतागुंतीचं झालं आहे.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफचं समीकरण सर्वात सोपं आहे. 24 मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध फक्त विजय मिळवायचा, मग तो 1 धावेने असो किंवा मोठ्या फरकाने. राजस्थान जिंकताच त्यांचे 16 गुण होतील आणि प्लेऑफचं तिकीट निश्चित होईल. प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या चार संघांपैकी 16 गुणांपर्यंत पोहोचू शकणारा राजस्थान हा एकमेव संघ आहे.

जर राजस्थानचा मुंबईकडून पराभव झाला, तरी त्यांची आशा पूर्णपणे संपणार नाही. अशावेळी लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सला हरवणं आवश्यक असेल. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने केकेआरवर विजय मिळवावा, पण तो इतक्या मोठ्या फरकाने नसावा की दिल्लीचा नेट रनरेट राजस्थानपेक्षा वर जाईल.

पंजाबचे राजे

पंजाब किंग्ससमोर पहिलं आव्हान म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवणं. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या संघाला  राजस्थान रॉयल्सने आपला शेवटचा मुंबई इंडियन्सविरुद्ध सामना गमवावा अशी प्रार्थना करावी लागेल. मात्र एवढ्यानंही पंजाबचा मार्ग मोकळा होणार नाही. दिल्ली कॅपिटल्सने केकेआरवर विजय मिळवणंही पंजाबसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्सला सर्वप्रथम दिल्ली कॅपिटल्सवर मोठा विजय मिळवावा लागेल. त्यामुळे त्यांचे 15 गुण होतील. पंजाब किंग्सही लखनऊला हरवून 15 गुणांपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे नेट रनरेट निर्णायक ठरणार आहे. केकेआरला आशा असेल की समान गुण झाल्यास त्यांचा नेट रनरेट पंजाबपेक्षा चांगला राहील. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सकडून पराभव होणंही केकेआरसाठी अत्यंत महत्त्वाचं असेल.

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्ससाठी प्लेऑफचा मार्ग सर्वात कठीण मानला जातो. केकेआरला हरवल्यानंतर त्यांचे 14 गुण होतील, पण त्यांचा -0.871 हा खराब नेट रनरेट पॉझिटिव्हमध्ये आणणं अत्यावश्यक आहे. केकेआरवर मोठा विजय मिळवल्यानंतर दिल्लीला राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी आपापले अखेरचे सामने गमवावेत, अशी आशा ठेवावी लागणार आहे. आता उरलेले हे तीन सामनेच आयपीएल 2026 च्या प्लेऑफचं अंतिम चित्र ठरवणार आहेत. एका जागेसाठी चार संघांमध्ये सुरू असलेली ही लढत आता अक्षरशः ‘करो या मरो’च्या टप्प्यावर पोहोचली आहे.

हे ही वाचा –

CSK Release 3 Players : CSK मधून 3 बड्या मॅचविनर्सची सुट्टी? लिस्टमध्ये धोनीच्या आवडत्या 1 विदेशी अन् 2 भारतीय खेळाडूंची नावे

आणखी वाचा

Comments are closed.