ऐन अधिकमासात नाशिकचे श्रीरामकुंड कोरडेठाक, भाविकांवर गांधी तलावात स्नान करण्याची वेळ

साधारण अडीच वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात पवित्र गोदावरी नदीतील श्रीरामकुंड येथील स्नानाला, तसेच गोदावरी पूजन व दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र ऐन अधिकमासातच महापालिका प्रशासनाने रामकाल पथांतर्गत कामासाठी श्रीरामकुंड कोरडे केले आहे, यामुळे परंपरेप्रमाणे येथे स्नानासाठी आलेल्या भाविकांची मोठी निराशा होत आहे, पर्यायी व्यवस्था म्हणून गांधी तलावात स्नान करून ते परतत आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या कामांमुळे श्रीरामकुंड व परिसरातील इतर कुंडही रिकामी करण्यात आली आहेत. या परिसरात 16 मेपासून 16 जुलैपर्यंत प्रवेशबंदी केलेली आहे. भाविकांना स्नानासाठी गांधी तलावात पाण्याची व्यवस्था केली आहे. सध्या ज्येष्ठ अधिकमास सुरू आहे. नेमके यावेळीच श्रीरामकुंड कोरडेठाक असल्याने स्नान, गंगा-गोदावरी पूजन यासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आजपर्यंत अधिकमासात श्रीरामकुंड रिकामे आहे, असे कधीच घडले नव्हते. ही कामे काही महिने आधीच हाती घेतली असती, तर आज येथे परंपरेप्रमाणे स्नानाचा लाभ घेता आला असता, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत भाविक प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला लक्ष्य करीत आहेत.

प्रशासनाने गांधी तलावात स्नानासाठी पर्यायी व्यवस्था करून दिली आहे. मात्र त्यामुळे भाविकांचे समाधान झालेले नाही, ते पाणी वाहते नाही, परिसरात पिण्याचेही पाणी उपलब्ध नाही, कुठल्याच सुविधा नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

धार्मिक विधींसाठी पर्यायी जागेचा वापर

श्रीरामकुंड हे कामासाठी कोरडे केलेले आहे, असे असले तरी येथील अस्थीकुंडाचा अस्थी विसर्जनासाठी वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यात अडचणी येत नाहीत. मात्र स्नानासाठी गांधी तलाव, तर पिंडदान व इतर धार्मिक विधींसाठी यशवंतराव महाराज पटांगण, भाजी बाजार पटांगणाचा पर्याय दिलेला आहे, तेथे जाण्यासाठी भर उन्हात पायपीट करावी लागत असल्याने भाविकांची परवड होत आहे.

नाशिकच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अधिक महिन्यात प्रथमच श्रीरामकुंड कोरडे आहे. गोदावरी नदी प्रवाहित ठेवावी, अशी आम्ही वारंवार मागणी केली. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. अधिकमासात गंगा-गोदावरी पूजन, स्नान, अपूप दान, 33 संख्येचे वाण यांना मोठे महत्त्व आहे, यासाठी दूरवरून भाविक मोठ्या संख्येने नाशिकला येतात. ही खरे तर भाविकांना सोयी-सुविधा देऊन सिंहस्थाची रंगीत तालिम करण्याची प्रशासनाला मोठी संधी होती. मात्र कुठल्याच सुविधा न पुरवून त्यांनी ही संधी गमावली आहे, अशी प्रतिक्रिया पुरोहित संघाचे सतिश शुक्ल यांनी दिली.

Comments are closed.