अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांचा सवाल
राज्यात वाढत चाललेल्या इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी निवडणूक आयोगाला राज्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यात मोठ्या प्रमाणावर इंधनटंचाई निर्माण झाली असून दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. पुण्यात तर जमावबंदीचे आदेश लागू करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची खरंच आवश्यकता आहे का, यावर गंभीरपणे विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधानपरिषद निवडणुकीत नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी, आमदारांची रिसॉर्टमध्ये व्यवस्था, पर्यटन आणि मतदारांचा कथित घोडेबाजार पाहायला मिळणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी शेकडो कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाने राज्यातील सध्याची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
निवडणुका पुढे ढकलल्यास राज्य सरकारलाही इंधनटंचाईसह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असेही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? यावर विचार होणं गरजेचं आहे.
असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 25 मे 2026
Comments are closed.