Mumbai News – मरीन ड्राइव्ह चेकपॉइंटवर भरधाव मर्सिडीजच्या धडकेत दोन पोलीस जखमी; चालकाला अटक
मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात रविवारी रात्री उशिरा हिट-अँड-रनची घटना समोर आली आहे. नाकाबंदी तपासणी मोहिमेदरम्यान एका भरधाव मर्सिडीज कारने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धडक दिली. यात दोन्ही पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. कृष्णकांत मिश्रा आणि राठोड अशी जखमी पोलीस कॉन्स्टेबलची नावे असून दोघेही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, निहाल सोलंकी (29) असे आरोपी कारचालकाचे नाव असून तो मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. रविवारी रात्री सोलंकी मरीन ड्राइव्ह परिसरात भरधाव वेगाने मर्सिडीज चालवत होता. यावेळी नाकाबंदी तपासणीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेग कमी करण्याऐवजी आरोपीने कथितरित्या वाहनाचा वेग वाढवला. त्यानंतर दोन पोलिसांना धडक देत तो घटनास्थळावरून पळून गेला.
मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला नालासोपारा येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. घटनेवेळी आरोपी नशेत असावा, असा पोलिसांना संशय आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मरीन ड्राइव्ह पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.