हॅलो, मला तात्काळ काही पैसे हवे आहेत; चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बोगस अकाऊंट, सायबर तक्रार

सोलापूर : सायबर गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असल्यानेच सायबर विभागही सतर्क झाला आहे. युपीआय पेमेंट असेल किंवा ऑनलाईन बँकींग प्रक्रियेतील पैशांची देवाण-घेवाणबाबत सातत्याने नागरिकांना सावधान करण्यात येते. मात्र, तरीही डिजिटल अरेस्ट किंवा सोशल मिडिया अकाऊंट हॅक करुन मोबाईल चॅटद्वारे इमोशनल मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. विशेष म्हणजे, चक्क जिल्हाधिकाऱ्यांनाही (Collector) या फ्रॉडचा सामना करावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. सोलापूरचे (Solapur) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाने व्हिएतनाम व थायलंड या देशातून नाव, पदनाम व छायाचित्र वापरून बनावट सोशल मीडिया खाते तयार करुनन नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या सोशल मीडियात खात्यामार्फत काही व्यक्तींना पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः सायबर सेल येथे या अनुषंगाने तक्रार दाखल केली असून पोलीस विभागाच्या सायबर सेल मार्फत गुन्ह्याची तपासणी सुरू झालेली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याकडून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अशा प्रकारे कोणत्याही नागरिकांकडून आर्थिक व्यवहार किंवा मागणी केली जात नाही. बनावट खाते व त्यावरील संदेशांमुळे नागरिकांची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा संदेशांना बळी पडू नये, तसेच कोणत्याही संशयास्पद संदेशांची त्वरित माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बनावट नाव, पदनाम आणि छायाचित्र वापरले

दरम्यान, सदर बनावट खात्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व छायाचित्र वापरून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एका व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर “Collector & District Magistrate” अशी नोंद करून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अशा प्रकारच्या फसवणुकीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

साताऱ्यात आंतरराष्ट्रीय टोळीला अटक

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी साताऱ्यातील सायबर विभागाने मोठी कारवाई करत ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून अनेक मोबाईल, लॅपटॉप आणि रोकडही जप्त करण्यात आली होती. त्यातच, आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट अकाऊंटद्वारे पैशांची मागणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा

तुम्ही अभिनेत्री व्हा अन् उमेदवारी अर्ज भरा, सुषमा अंधारेंना सुशांत शेलारांचे प्रत्युत्तर, मान अशी तशी म्हणत डिवचलं

आणखी वाचा

Comments are closed.