हृदयद्रावक! भालांजन येथे पित्याने चार चिमुकल्यांसह उचलले टोकाचे पाऊल
कौटुंबिक वादातून एका पित्याने स्वतःच्या चार चिमुकल्या मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावात उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतकांमध्ये विजय मुसा किराडिया (35) यांच्यासह त्यांची मुले प्रीत (7), प्राची (5), पूर्वी (4) आणि पियुष (2) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणावरून विजय किराडिया आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पत्नी माहेरी इस्लामपूर येथे निघून गेली. दुसर्या दिवशी सकाळी विजयने मुलांना चहा पाजल्यानंतर त्यांना जवळील शेतातील विहिरीवर नेले. तेथे त्याने दोन मुलगे व दोन मुलींना विहिरीत ढकलून दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर विजयने विहिरीलगत दोरीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दोरी तुटल्याने तोही विहिरीत पडला. काही वेळाने शेतकर्यांना विहिरीजवळ मोबाईल, चप्पल आणि तुटलेली दोरी आढळल्याने घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.