सोलापूर जिल्ह्यात पुन्हा पाऊस; महापुराचा विळखा कायम, वीज उपकेंद्रे पाण्यात, 50 गावे अंधारात
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस शुक्रवारी सकाळपासून पुन्हा सुरू झाला आहे. हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आले असून, सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक वीज उपकेंद्रे पाण्यात गेल्याने ५० गावे अंधारात आहेत.
गेल्या २० दिवसांपासून अतिवृष्टीचा फटका जिल्ह्याला बसला. सहा तालुके पूर व अतिवृष्टीने बाधित झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ९१ पैकी ६६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेती व नागरी जीवन प्रभावित झालेली असतानाच शनिवार व रविवार रोजी जिल्ह्यात हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे आणि शेजारील धाराशिव व अहिल्यानगर जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ असून, त्याचा फटका जिल्ह्याला बसणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे माढा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट या सहा तालुक्यांत प्रचंड नुकसान झाले आहे. माढा, करमाळा, मोहोळ या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले असून, ८० गावांत प्रचंड नुकसान झाले आहे, असे आशीर्वाद यांनी सांगितले. जिल्ह्यातील पूरस्थिती हाताळण्यात ‘एनडीआर’ आणि स्थानिक पथकांनी महत्त्वाची भूमिका बजाविली असून, ४००२ नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, लातूर येथून २५ बोटींचा वापर करण्यात आला. या बचावकार्यात १२५ कर्मचारी होते. जिल्ह्यात ७२ मदत केंद्रे सुरू करण्यात आली असून, पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जनजीवन विस्कळीत
शुक्रवारी पावसाने दिवसभर झोडपले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बार्शी आणि सोलापूर ग्रामीण भागातील वीज उपकेंद्रे पाण्यात असल्याने हून अधिक गावे अंधारात आहेत. या पावसात वीज मंडळाचे सुमारे २४ कोटींचे नुकसान झाले आहे.
विमानसेवेलाही फटका
अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दोन दिवस एसटी बससेवा आणि रेल्वे वाहतूक बंद असताना आता खराब हवामानाचा विमान सेवेला फटका बसला आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवा नुकतीच सुरू झाली आहे. मात्र, आज विमानाचे उड्डाण झाले नाही.
Comments are closed.