राज्यातील महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार; राज्य आयोगाकडून ‘निवडणूक’ कामाला वेग

मुंबई : राज्यातील राजकीय पक्षांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना आता निवडणुकांचे (Election) वेध लागले असून दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके फूटणार आहेत. त्यासाठी, राज्य निवडणूक आयोग आणि प्रशासनाचं कामकाज सुरू झालं असून राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महापालिका सह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचना 25 ऑगस्टला प्रसिद्ध करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती सूचना मागवणे यासाठी 22 ते 28 ऑगस्टचा वेळ देण्यात आला आहे. मात्र, काही महापालिकांचे (mahapalika) प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव हे राज्य निवडणूक आयोगाला महापालिकांकडून उशिरा प्राप्त झाल्याने सोमवारी प्रभाग रचना प्रसिद्ध करणार असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर सूचना व हरकतींवर सुनावणी घेऊन प्रभाग रचना अंतिम करण्याचं काम केलं जाईल आणि त्यानंतर प्रभाग रचना आराखडा नगर विकास विभागाला पाठवला जाणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी 10 महापालिकांच्या प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या आहेत. गट ड च्या महापालिकांच्या प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून प्राप्त होत असल्याची माहिती आहे. मुंबई,नागपूर,पुणे,ठाणे,नाशिक, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजी नगर,वसई विरार,नवी मुंबई या महापालिकांच्या प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून राज्य निवडणूक आयोगांकडे प्राप्त झाल्या आहेत. सोमवारी यातील बहुतांश महापालिका प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाकडून केला जाईल.

दरम्यान, ‘ड’ वर्गाच्या  महापालिकांच्या प्रभाग रचना या 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यानंतर त्यावर हरकती मागवल्या जातील.

असं असेल वेळापत्रक –

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती मागवणे – 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट
प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेणे – 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर
सुनावणी नंतर हरकती आणि सूचनांवर शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम करून नगर विकास विभागाला पाठवणे
अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला  सादर करणे- 22 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर
राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देणे
राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभाग रचना  अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे – 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर

दरम्यान, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्या त्या महापालिका क्षेत्रातील राजकीय नेते आणि कार्यकर्ते निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतील.

हेही वाचा

होय, देवेंद्र फडणवीसांचा फोन आला होता; शरद पवार स्पष्टच बोलले, निवडणूक आयोगावरही चिडले

आणखी वाचा

Comments are closed.