ब्रिटनच्या संरक्षण मंत्र्यांचे विमान हवेतच अडकले, रशियावर GPS जॅमिंगचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हीली प्रवास करत असलेल्या रॉयल एअरफोर्स विमानाच्या जीपीएस सिस्टीममध्ये रशियाच्या सीमेजवळ बिघाड झाला असून, यामागे रशियाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही अडचण संपूर्ण तीन तासांच्या उड्डाणादरम्यान कायम होती. जॉन हीली हे एस्टोनियामध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश सैनिकांची भेट घेऊन ब्रिटनला परतत असताना हा प्रकार घडला. परतीच्या प्रवासात त्यांचे विमान रशियाच्या सीमेजवळून जात असताना अचानक विमानाची जीपीएस सिस्टीम बंद पडली. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या घटनेदरम्यान विमानातील प्रवाशांचे मोबाइल फोन आणि लॅपटॉपही इंटरनेटला कनेक्ट होत नव्हते. जीपीएस बंद पडल्यामुळे वैमानिकांना दुसऱ्या नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करावा लागला. याच दरम्यान, विमानातील प्रवाशांना सांगण्यात आले की, विमान पूर्णपणे सुरक्षित असून उड्डाण सुरू ठेवता येईल. जॉन हीली हे रॉयल एअरफोर्सच्या डसॉल्ट फाल्कन 900LX या विमानातून प्रवास करत होते आणि त्यांच्यासोबत काही पत्रकार उपस्थित होते.

या घटनेच्या अवघ्या एक दिवसापूर्वीच ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने रशियाच्या एका धोकादायक कारवाईची माहिती दिली होती. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात काळ्या समुद्रावर रशियन लढाऊ विमानांनी RAF च्या एका हेरगिरी करणाऱ्या विमानाला अतिशय धोकादायक पद्धतीने अडवले होते. रशियाच्या Su-35 फायटर जेटने ब्रिटिश विमानाच्या इतक्या जवळून उड्डाण केले की, ब्रिटिश विमानाची इमर्जन्सी सिस्टीम चालू झाली आणि ऑटोपायलट यंत्रणा बंद पडली. तसेच रशियाचे एक Su-27 विमान ब्रिटिश रिव्हेट जॉइंट विमानाच्या केवळ ६ मीटर अंतरापर्यंत पोहोचले होते आणि त्याने ब्रिटिश विमानासमोरून सहा वेळा उड्डाण केले. ब्रिटनने याला २०२२ नंतरची रशियाची सर्वात धोकादायक कारवाई म्हटले आहे. रिव्हेट जॉइंट हे एक गुप्तचर विमान असून ते नाटो मोहिमेअंतर्गत रशियन हालचालींवर लक्ष ठेवते.

Comments are closed.