ऑपरेशन क्रॅकडाऊनचा दणका, 27 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; बोलेरो पिकअपसह तिघांवर गुन्हा दाखल
नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित जर्दा व तंबाखूचा साठा जप्त केला आहे. इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या धडक कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह तब्बल 27 लाख 1 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सूरज गुरव यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान दि. 24 मे 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती अशी की, शिवणीकडून कोसमेटकडे एका महिंद्रा बोलेरो पिकअपमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा वाहतूक केली जात आहे.
माहितीच्या आधारे कोसमेट शिवारातील आर्या बार परिसरात सापळा रचण्यात आला. दरम्यान, एम. एच. 26 सी. एच. 0264 क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप अडवून तपासणी केली असता वाहनातून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, जर्दा व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित मालाची किंमत 17 लाख 1 हजार 250 रुपये असून वाहनासह एकूण मुद्देमाल 27 लाख 1 हजार 250 रुपयांचा आहे.
या प्रकरणी चालक सय्यद मोहम्मद अली सय्यद सादीक (21), सय्यद अमेर सय्यद खमर, आणि शेख मझहर यांच्याविरुद्ध इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान चालकाने सदर माल सय्यद अमेर सय्यद खमर याचा असून तो तेलंगणातील शेख मझहर याच्याकडून आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियमातील कलम 26, 27, 30(2)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.