दहशतवाद आणि काश्मीर मुद्द्यावरून भारताने यूएनमध्ये पाकिस्तानला पुन्हा फटकारले

दहशतवाद आणि जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले. पाकिस्तानला आरसा दाखवत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले की, सीमेपलीकडील दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. त्याचे परिणाम भोगण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पी हरीश म्हणाले, “आज मला पाकिस्तानने केलेल्या निराधार आणि अनावश्यक टिप्पण्यांना प्रत्युत्तर द्यायला भाग पाडले आहे. भारताला वस्तुस्थिती स्पष्ट करायची आहे. स्वतंत्र भारताने पाकिस्तानच्या सीमेपलीकडील आक्रमणाशी लढा देत आपला प्रवास सुरू केला. पाकिस्तानला पूर्णपणे कायदेशीर आणि कायमचे भारताचा भाग बनलेल्या भारतीय प्रदेशांवर कब्जा करायचा होता.”
'हजार जखमा देऊन भारताला रक्तबंबाळ करायचं' हे धोरण
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तानने भारतावर अनेक युद्धे आणि विनाकारण हल्ले करून आणि सीमेपलीकडील दहशतवादाला सतत प्रोत्साहन देऊन सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाच्या तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. सीमेपलीकडील दहशतवादाचा पाकिस्तानचा वापर आणि 'भारताला हजारो जखमा करून रक्तरंजित करण्याचे' धोरण संयुक्त राष्ट्रांच्या दाव्याचा पर्दाफाश करते.”
'गंभीर परिणाम होतील'
पी हरीश म्हणाले, “भारताला अशा सीमेपलीकडील दहशतवादापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या कृतींचे गंभीर परिणाम होतील हे पाकिस्तानला मान्य करावे लागेल.”
'दहशतवादाचे समर्थन पूर्णपणे आणि कायमचे थांबले पाहिजे'
“पाकिस्तानने सुरुवातीपासूनच दहशतवाद, धार्मिक कट्टरता, हिंसक अतिरेकी आणि भारतविरोधी प्रचार या दुष्ट शक्तींचा सातत्याने वापर केला आहे. या संदर्भातील तथ्य सार्वजनिक रेकॉर्डमध्ये उपलब्ध आहे आणि त्यांना आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. पाकिस्तानने दहशतवादाचे सर्व प्रकार आणि स्वरूपातील समर्थन पूर्णपणे आणि कायमचे बंद केले पाहिजे,” असा इशारा त्यांनी दिला.
Comments are closed.