हार्बरवर लवकरच जलद लोकल, मार्गिकेची चाचपणी; एमयूटीपी-4 प्रकल्पांतर्गत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
कित्येक वर्षे उपेक्षित राहिलेल्या हार्बर रेल्वेच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) ठोस पावले उचलली जात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईची जलद कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हार्बर मार्गावर जलद गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी केली जाणार आहे. या हेतूने एमयूटीपी-4 प्रकल्पांतर्गत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलपर्यंत विस्तार असलेल्या हार्बर रेल्वे मार्गिकेवर अजूनही केवळ धिम्या गाड्या धावत आहेत. जागेअभावी अतिरिक्त ट्रकचे काम करणे मुश्कील बनल्याने ही मार्गिका अद्याप धिम्या ट्रकवरच आहे. पनवेल आणि नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत असल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या वाढती आहे. या प्रवाशांना जलद प्रवास करता येत नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. याचा विचार करत एमआरव्हीसीने हार्बरचे विस्तारीकरण एमयूटीपी-4 प्रकल्पांतर्गत मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सध्या सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी जलद मार्गिका व्यवहार्य ठरणारी आहे का? जलद मार्गिकेचे काम कोणत्या भागातून करता येईल याचा अभ्यास एमयूटीपी-4 प्रकल्पांतर्गत केला जाईल. त्याचबरोबर ठाणे-बोरिवली आणि वांद्रे-कुर्ला अशाप्रकारे रेल्वे कनेक्टिव्हिटी शक्य आहे का याचाही अभ्यास करण्यात येईल, असे एमआरव्हीसीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.
लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने एमआरव्हीसीमार्फत अत्यंत प्रगत मानली जाणारी ’ट्रेन कंट्रोल अँड मॉनिटरिंग सिस्टम’ (टीसीएमएस) लागू करण्यात येत आहे. त्या दिशेने पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम केले जात आहे. लोकल ट्रेनची प्रवासी क्षमता वाढल्यानंतर जीवघेण्या गर्दीपासून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
नवीन डिझाईनच्या एसी लोकल येणार
पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकल प्रवास अधिक आरामदायी करण्याचे एमआरव्हीसीचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार नॉन-एसी गाड्यांचे एसी गाड्यांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. प्रवासी सेवेत नजीकच्या काळात 238 नवीन डिझाईनच्या एसी लोकल दाखल केल्या जाणार आहेत. यासंदर्भातील निविदा जूनपर्यंत अंतिम करण्यात येणार असल्याचे एमआरव्हीसीने स्पष्ट केले.
‘मिशन झीरो डेथ’अंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास
उपनगरी रेल्वे मार्गावरील प्रवासी मृत्यूचे सत्र थांबवण्यासाठी ‘मिशन झीरो डेथ’अंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील 17 स्थानकांपैकी 5 स्थानकांचा कायापालट केला असून उर्वरित स्थानकांच्या कामाला गती दिली जाणार आहे. यात दादर, घाटकोपर, वसई, भांडुप आदी प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
Comments are closed.