मुंबईसाठी मोठा विजय! सार्वजनिक जागा आणि रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडला; आदित्य ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेने सत्ताधाऱ्यांची माघार, प्रस्ताव घेतले मागे
मुंबईतील रक्तपेढ्यांचे खासगीकरण करून आणि मोकळ्या मैदानांचे आरक्षण बदलून मुंबईकरांचे रक्त आणि श्वास विकण्याचा घाट मिंधे-भाजपने घातला आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला होता. तसेच मिंधे-भाजपच्या या कारस्थानाला शिवसेना पूर्ण ताकदीनिशी विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले. अखेर मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीच्या बुधवारच्या बैठकीत दोन्ही प्रस्ताव मागे घेण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तसेच हा ‘मुंबईसाठी मोठा विजय!’ असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सुधार समितीने हा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने ते प्रस्ताव मंजुरीविना मागे पाठवले आहेत अशी माहिती देतानाच मुंबईकरांच्या हिताच्या अशा आपल्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार देखील मानले आहे. तसेच विरोधी पक्ष म्हणून, बीएमसीच्या मोकळ्या जागा, सार्वजनिक शाळा आणि सेवांचे खासगीकरण करण्याचा असा प्रत्येक प्रयत्न आम्ही हाणून पाडत राहू आणि त्याला विरोध करत राहू, असे ठणकावून सांगितले आहे.
मुंबईचा मोठा विजय!
आमच्या पत्रकार परिषदेचा आणि आवाहनाचा परिणाम!काल आमच्या पत्रकार परिषदेनंतर बीएमसीच्या सुधार समितीने सर्व प्रस्ताव परत पाठवले आहेत:
🚨 खाजगीकरण @mybmc च्या रक्तपेढ्या (नेहमीच मोफत आणि BMC सह)
🚨 रूपांतरित करत आहे…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 27 मे 2026
आदित्य ठाकरे यांच्या पोस्ट मध्ये ते म्हणातात,’ मुंबईसाठी मोठा विजय! आमच्या पत्रकार परिषदेचा आणि आवाहनाचा मोठा परिणाम! काल झालेल्या आमच्या पत्रकार परिषदेनंतर, मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने खालील सर्व प्रस्ताव मंजुरीविना मागे पाठवले (रेफर बॅक केले) आहेत: बीएमसीच्या रक्तपेढ्यांचे खासगीकरण करणे आणि मनोरंजन मैदाने निवासी भूखंडांमध्ये रूपांतरित करणे – ज्यातील एक एक्झिबिशन सेंटर, एक उद्योगपतीच्या घरासाठी आणि एक बिल्डरसाठी देण्याचे प्रस्तावित होते. आम्ही गेल्या आठवड्यातही याला विरोध केला होता आणि आजही स्पष्ट विरोध केला. आज हे प्रस्ताव मागे पाठवण्यात आले असल्याने, ते आता रद्दच करावे लागतील आणि बीएमसीने हे सुनिश्चित केले पाहिजे की सार्वजनिक जागा आणि सेवा या सार्वजनिकच राहतील’.
‘विरोधी पक्ष म्हणून, बीएमसीचा मोकळ्या जागा, सार्वजनिक शाळा आणि सेवांचे खाजगीकरण करण्याचा असा प्रत्येक प्रयत्न आम्ही हाणून पाडत राहू आणि त्याला विरोध करत राहू. मुंबईकरांच्या हिताच्या आमच्या या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो!’.
Comments are closed.