RR vs SRH Eliminator: वैभव सूर्यवंशीसाठी वॉर्निंग! पॅट कमिन्सचे युवा फलंदाजासाठी तीन वेगवेगळे प्लॅन

आज (२७ मे) आयपीएल २०२६ मध्ये एलिमिनेटर सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला जाणार आहे. न्यू चंदीगडच्या मुल्लाणपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यातून जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेबाहेर होणार असल्याने दोन्ही संघ जिंकण्याच्या प्रयत्नात असतील. या सामन्यासाठी एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने काही योजना केल्या असून मागील चुकांमधून शिकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या हंगामात हे दोन्ही संघ दोनदा भिडले, त्या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीविरुद्ध एसआरएचला दोन भिन्न निकाल मिळाले. पहिल्या सामन्यात एसआरएचला त्याला लवकर बाद करण्यात यश आले, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. असे वेगवेगळे निकाल मिळाले असले तरी विजय मात्र एसआरएचचाच झाला.

एलिमिनेटर सामन्याआधी जिओस्टारशी बोलताना कमिन्स म्हणाला, “एक गोलंदाज म्हणून, आपण नक्की कशात पारंगत आहोत हे समजून घेणे आणि आपल्या बलस्थानांचा वापर करून गोलंदाजी कशी करायची, या गोष्टींचा समतोल राखणे नेहमीच महत्त्वाचे असते. परंतु, जेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक फळीमध्ये असे एखाद-दुसरे खेळाडू असतात जे आपल्या हातून सामना हिरावून घेऊ शकतात, तेव्हा आपण ‘प्लॅन बी’ (Plan B) किंवा ‘प्लॅन सी’ (Plan C) तयार करण्यावर थोडा अधिक वेळ खर्च करतो. त्यामुळे, हो—आम्ही त्याच्यासाठी नक्कीच रणनीती आखू. जरी गेल्या वेळी त्याने आमच्याविरुद्ध शतक ठोकले असले, तरी मला असे वाटले की काही प्रसंगी आम्ही त्याला खरोखरच चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याला शांत ठेवण्यात यशस्वी ठरलो होतो. इतर वेळी मात्र, तो आमच्या नियंत्रणाबाहेर गेला. त्यामुळे, आम्ही त्या अनुभवातून नक्कीच धडा घेऊ.”

Comments are closed.