Ratnagiri News – साखरप्याच्या आकांक्षा कदमचे आणखी एक यश; राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत 15 वे विजेतेपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संगमेश्वर तालुक्यातील देवडे (साखरपा) येथील आंतरराष्ट्रीय कॅरमपटू तथा मा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती आकांक्षा उदय कदम हिने आपल्या कारकिर्दीतील 15 वे राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले आहे. तिच्या या यशामुळे साखरपा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व सिव्हिल फेडरेशन रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली येथील मंडपेश्वर सिव्हिल फेडरेशन येथे 23 ते 25 मे 2026 दरम्यान राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आकांक्षाने उत्कृष्ट आणि दमदार खेळी करत उपांत्य फेरीत मिताली पिंपळे हिचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात तिने ठाण्याच्या समृद्धी घाडीगांवकर हिच्यावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत दिमाखदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले. हे तिच्या कारकिर्दीतील 15 वे राज्यस्तरीय विजेतेपद ठरले. आकांक्षा कदम हिला गतवर्षी महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा मा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला असून, तिच्या या नव्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.