मध्य रेल्वेवर ‘एसी लोकल’च्या प्रवासाला वाढती पसंती; रोजचे प्रवासी 1.30 लाखांच्या घरात
मुंबई शहरात उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. याचदरम्यान मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकल ट्रेनला प्रवाशांकडून वाढती पसंती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून दररोज 1.30 लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत एसी लोकलमधून 1.50 कोटी प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल फेऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्याच्या वाढत्या उकाड्यात एसी लोकल फेऱ्यांनाही मोठी गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने बुधवारी प्रवासी संख्येची आकडेवारी जाहीर केली. प्रशासनाच्या माहितीनुसार, एसी लोकल फेऱ्यांमध्ये 26 जानेवारी ते 20 मे या अवधीत गेल्यावर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली. यंदा प्रत्येक लोकल फेरीमागे सरासरी 1664 प्रवाशांनी प्रवास केला. गेल्यावर्षी प्रत्येक एसी लोकल फेरीमागे सरासरी 1474 प्रवाशांची नोंद झाली होती. मध्य रेल्वेने 26 जानेवारी ते 20 मे 2026 या कालावधीत 8,991 एसी लोकल फेऱ्या चालवल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत 6,834 एसी फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत एसी लोकल फेऱ्यांचे प्रमाण 31.6 टक्क्यांनी वाढले आहे.
Comments are closed.