आयपीएलमध्ये संपूर्ण सीझन बाकावर; बाहेर पडताच खेळाडूची वादळी सेंचुरी, टीकाकारांना दिलं जोरदार उत्तर!

आयपीएलमध्ये संपूर्ण हंगामभर बाकावर बसवण्यात आलेल्या एका खेळाडूने संघातून बाहेर पडताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्र याने आयर्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावत आपल्या टीकाकारांना जोरदार उत्तर दिले. विशेष म्हणजे, त्याच्यासोबत टॉम ब्लंडेल यानेही शतकी खेळी करत न्यूझीलंडची अवस्था सावरली.

न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात कसोटी सामना सुरू असून, पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. मात्र संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार टॉम लॅथम शून्यावर बाद झाला, तर डेवॉन कॉन्वे केवळ ४ धावा करून माघारी परतला. माजी कर्णधार केन विल्यमसन यालाही मोठी खेळी करता आली नाही आणि तो ३६ धावांवर बाद झाला.

संघ संकटात असताना रचिन रवींद्र आणि टॉम ब्लंडेल यांनी डाव सावरला. रचिन रवींद्रने १९४ चेंडूत १२१ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. आयपीएल २०२६ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. केकेआरने त्याच्यावर तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले होते, मात्र संपूर्ण हंगामात त्याला एकाही सामन्यात अंतिम अकरामध्ये संधी देण्यात आली नाही. याआधी रचिन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसला होता.

रचिननंतर टॉम ब्लंडेलनेही अप्रतिम फलंदाजी केली. सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या ब्लंडेलने २३३ चेंडूत १४२ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने १८ चौकार आणि २ षटकार लगावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ५ गडी गमावून ३६१ धावा केल्या होत्या आणि सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती.

हा सामना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नसला तरी खेळाडूंच्या कामगिरीचा परिणाम आयसीसी क्रमवारीवर होणार आहे. आयर्लंड संघ डब्ल्यूटीसीचा भाग नसल्याने या सामन्याला गुण मिळणार नाहीत, मात्र वैयक्तिक क्रमवारीत या कामगिरीचा प्रभाव निश्चितपणे दिसून येणार आहे.

Comments are closed.