Iran US War – अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराण भडकला; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव

अमेरिकेने इराणच्या दक्षिणेकडील बंदर अब्बास एअरपोर्ट परिसराला लक्ष्य केल्यानंतर आखातातील तणाव कमालीचा वाढला आहे. अमेरिकेच्या या लष्करी कारवाईवर इराणने तीव्र संताप व्यक्त करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेतली असून यात तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इश्माईल बाकाई यांनी गुरुवारी सकाळी अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. अमेरिकेची ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे थेट आणि गंभीर उल्लंघन आहे, असे बाकाई यांनी स्पष्ट केले. सुरक्षा परिषदेने आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडत अमेरिकेला या हल्ल्यासाठी जबाबदार धरावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अमेरिकेकडून 9 एप्रिल रोजी झालेल्या युद्धविराम उल्लंघनाचा तसेच पर्शियन गल्फमधील व्यावसायिक जहाजांवर झालेले हल्ले आणि दक्षिण इराणमधील हवाई हल्ल्यांचा दाखला देत इराणने अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इराणच्या ‘आयआरएनए’ न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे.

ओमानला धमकी, ट्रम्प यांच्यावर टीका

संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमधील अनुच्छेद 51 चा हवाला देत इराणने आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कोणतीही पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओमानबाबत केलेल्या विधानाचाही इराणने निषेध केला. होर्मुजची सामुद्रधुनी खुली न ठेवल्यास ओमानला उडवून देऊ अशी धमकी अमेरिकेकडून देण्यात आली आहे. याबाबत बोलताना बाकाई म्हणाले, ओमान हा संयुक्त राष्ट्रांचा एक जबाबदार सदस्य देश असून त्याने नेहमीच प्रादेशिक शांततेसाठी मध्यस्थाची रचनात्मक भूमिका बजावली आहे. अमेरिकेची अशी भाषा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अराजकता आणि दादागिरी वाढवणारी असून ती अत्यंत धोकादायक आहे. या संकटाच्या काळात इराण ओमानसोबत पूर्ण ताकदीने उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

Iran Us War – बंदर अब्बास एअरपोर्टजवळील हल्ल्यानंतर इराणची सटकली, थेट अमेरिकन हवाई तळाला केलं लक्ष्य

लेबनानमध्ये 11 जणांचा मृत्यू

एकीकडे अमेरिका-इराण तणाव वाढत असतानाच लेबनानच्या दक्षिण भागात इस्रायलने भीषण हल्ला आहे. गुरुवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांत 11 जण मारले गेले असून 21 जण जखमी झाले आहेत. सिदोन शहरातील एका इमारतीवर इस्रायलने हवाई हल्ला केला. यात दोन महिलांसह 5 जणांचा मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले. जखमींमध्ये 5 लहान मुलांचा समावेश आहे. तसेच सिदोन जिल्ह्यातील अदलून गावामध्ये एका धावत्या वाहनाला इस्रायली सैन्याने लक्ष्य केले. या भीषण हल्ल्यात दोन लहान मुले, त्यांची आई आणि वडील यांच्यासह एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.

Comments are closed.