T20 World Cup ची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर! ICC ने केली हिंदुस्थानच्या चौघींसह अंपायर्स आणि मॅच रेफरींच्या नावाची घोषणा
ICC Women’s T20 World Cup 2026 ला 12 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. वनडे वर्ल्ड कप विजेता टीम इंडियाचा संघ सुद्धा काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. तर गतविजेता न्यूझीलंडच्या संघाने सुद्धा या स्पर्धेसाठी कंबर कसून मेहनत घेतली आहे. दरम्यान, ICC ने या स्पर्धेसाठी 14 अंपायर्स आणि 4 मॅच रेफरींच्या नावाची घोषणा केली असून यामध्ये चार हिंदुस्थानी महिला अंपार्यचा सुद्धा समावेश आहे.
ICC Women’s T20 World Cup मध्ये सलग तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अधिकृत पॅनलमध्ये केवळ महिलांचाच समावेश करण्यात आला आहे. एकूण 33 सामन्यांच्या नियोजनाची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळच्या पॅनेलमध्ये 9 सदस्य अशा आहेत ज्यांनी 2024 च्या विश्वचषकातही जबाबदारी पार पाडली होती. ऑस्ट्रेलियाची क्लेयरे पोलोसाक ही या ग्रुपमधील सर्वात अनुभवी अंपायर असून, ती सहाव्यांदा या स्पर्धेत आपली भूमिका बजावेल. पोलोसाक यांनी आतापर्यंत 22 विश्वचषक सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे. त्यांच्यासोबतच जैकलीन विलियम्स आणि किम कॉटन या अनुभवी अंपायर्सचाही समावेश आहे, ज्यांनी प्रत्येकी 19 सामन्यांचा अनुभव गाठीशी बांधला आहे.
IPL 2026 – फक्त तीन शब्दांत वातावरण टाईट! हैदराबादला चोपल्यानंतर वैभव सूर्यवंशीची पोस्ट चर्चेत
या जागतिक स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या चार महिलांची निवड करण्यात आली आहे. अनुभवी मॅच रेफरी जीएस लक्ष्मी पुन्हा एकदा आपली भूमिका चोख बजावताना दिसतील. अंपायरिंग क्षेत्रात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जननी एन, वृंदा राठी आणि गायत्री वेणुगोपालन या तिघींची निवड झाली आहे. अंपायर्सच्या या यादीत जगभरातील दिग्गज महिलांचा समावेश असून, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडेल.
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी अंपायर्स
लॉरेन एगेनबॅग, किम कॉटन, ॲना हॅरिस, शथिरा झाकीर जेसी, कॅरिन क्लास, कँडिस ला बोर्डे, निमाली परेरा, क्लेअर पोलोसाक, जननी एन (हिंदुस्थान), वृंदा राठी (हिंदुस्थान), गायत्री वेणुगोपालन (हिंदुस्थान), सुझॅन रेडफर्न, एलोइस शेरिडन, जॅकलिन विल्यम्स.
महिला टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी मॅच रेफरी
ट्रुडी अँडरसन, शांद्रे फ्रिट्झ, जी.एस. लक्ष्मी (हिंदुस्थान), मिशेल परेरा.
Comments are closed.