Singapore Open 2026: सिंधू, लक्ष्य यांच्यासह सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत दाखल; प्रणॉय स्पर्धेबाहेर
गुरूवार (28 मे) भारतीय बॅडमिंटनसाठी चांगला ठरला. सिंगापूर ओपनमध्ये पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक साईराज-चिराग शेट्टी यांनी आपापल्या प्रकाराच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तसेच तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या मिश्र जोडीने दिवसातील एक उल्लेखनीय पुनरागमन केले आहे.
महिला एकेरीमध्ये सिंधूने आपल्या कामगिरीत सातत्य राखत जपानच्या रिको गुंजीला अवघ्या 37 मिनिटांत 21-9, 21-12 असे सरळ गेममध्ये पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला आहे. ती या सामन्यामध्ये सुरूवातीपासूननच पूर्णपणे नियंत्रणात दिसत होती, तिने सहजपणे रॅलीवर वर्चस्व गाजवले आणि प्रतिस्पर्ध्याला स्थिरावण्याची खूपच कमी संधी दिली. पहिल्या फेरीत इंडोनोशियाची पाचवी मानांकित पुत्री कुसुमा वर्दानी हिला 21-17, 21-18 असे पराभूत केले होते. तिच लय कायम राखत सिंधूने या स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. आता तिचा पुढील सामना ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आन से यंगशी होईल, जिला तिने याआधीच्या खेळलेल्या आठ सामन्यांमध्ये कधीही हरवलेले नाही.
पुरुष दुहेरीत चौथे मानांकित सात्विक आणि चिराग यांना तीन गेमच्या लढतीत चायनीज तैपेईच्या ली झे-हुई आणि यांग पो-ह्सुआन या जोडीला कडवी झुंज दिली. पहिला गेम २१-१५ ने जिंकल्यानंतर भारतीय जोडीचे सामन्यावर पूर्ण नियंत्रण दिसले. दुसऱ्या गेममध्ये मात्र त्यांची लय थोडी बिघडली आणि तैपेईच्या जोडीने 21-11 असा गेम जिंकत सामना निर्णायक गेममध्ये नेला, ज्यामध्ये भारतीय जोडी वरचढ ठरली. हा गेम सात्विक-चिरागने 21-18 असा जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या मलेशियाच्या चेन टॅंग जी आणि तोह ई वेई या जोडीशी होईल.
पुरुष एकेरीमध्ये थायलंडच्या कुनलावूत विटिडसर्नने सामना सुरू झाल्यानंतर काही क्षणांत माघार घेतल्याने लक्ष्य उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. पॅरिस २०२४ च्या रौप्यपदक विजेत्याने केवळ दोन गुण खेळून झाल्यावर माघार घेतली, ज्यामुळे लक्ष्य अवघ्य एका मिनिटातच पुढील फेरीत दाखल झाला. उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना जपानच्या कोकी वातानाबे याच्याशी होईल.
तसेच एचएस प्रणॉयचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्याचा सामना माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह केन यू याच्याशी झाला, ज्यामध्ये प्रणॉय 21-18, 21-16, 21-15 असा पराभूत झाला.
सर्व उपांत्यपूर्व फेरीचे सामने शुक्रवारी (२९ मे) खेळले जाणार आहेत.
Comments are closed.