कर्नाटकचे नवीन होणारे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची एकूण संपत्ती किती?
डीके शिवकुमार नेट वर्थ: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित नसल्याने, त्यांनी राज्यपालांचे विशेष सचिव, प्रभू शंकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर करण्यासाठी राजभवनात धाव घेतली. या बैठकीदरम्यान सिद्धरामय्या खूप भावूक झालेले दिसले. आता डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे उत्तराधिकारी होणार आहेत. दरम्यान, डीके शिवकुमार यांची एकूण संपत्ती किती आहे याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
डी. के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार
राजीनामा देण्यापूर्वी, सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा केली, ज्या दरम्यान त्यांनी राजीनामा देण्याचा आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी हेही जाहीर केले की, काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार, उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार हे पुढील मुख्यमंत्री असतील. तेव्हापासून डी. के. शिवकुमार यांच्या संपत्तीबद्दल चर्चा वाढत आहे.
डी. के. शिवकुमार यांची एकूण संपत्ती किती?
डी. के. शिवकुमार यांची एकूण घोषित मालमत्ता अंदाजे 1413 कोटी आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, यामध्ये 1140 कोटींची जंगम मालमत्ता आणि 273 कोटींची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. त्यांच्यावर अंदाजे 265 कोटींचे दायित्व देखील आहे. 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. 2018 मध्ये, त्यांची घोषित मालमत्ता 840 कोटी होती, ज्यात आता लक्षणीय वाढ झाली आहे.
महागड्या गाड्या आणि घड्याळांचे शौकीन
डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांना महागड्या गाड्या आणि क्लासिक घड्याळांची प्रचंड आवड आहे. त्यांच्या मालकीची नोंदणीकृत टोयोटा क्वालिस आणि रोलेक्स व हब्लॉटसारख्या उच्च-श्रेणीच्या ब्रँड्सची घड्याळे आहेत. त्यांच्याकडे सोने, चांदी आणि इतर मालमत्ता देखील आहे.
गुन्हेगारी खटलेही दाखल
प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की, 2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी कनकपुराचे आमदार शिवकुमार यांच्यावर 19 गुन्हेगारी खटले प्रलंबित होते.
हायकमांडने मला जसं सांगितलं तसं केलं
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या सर्व चर्चा आणि तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हायकमांडने मला जसं सांगितलं तसं केलं, असं म्हणताना सिद्धारमय्या काहीसे भावुक झाल्याचं दिसून आलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता डी के शिवकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.