IPL 2026 Final: घरच्या मैदानावर RCB ला धक्का देण्यास GT सज्ज! कॅप्टन गिलची खास रणनीती
आयपीएल २०२६ मधील क्वालिफायर २ सामना शुक्रवारी (२९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात जीटीने चांगली कामगिरी करत कर्णधार शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर सामना ७ विकेट्सने जिंकला आणि तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यानंतर गिलने अंतिम सामन्याच्या तयारीबद्दल वक्तव्य केले आहे.
आरआरने दिलेल्या २१५ धावसंख्येचे लक्ष्य जीटीने १८.४ षटकांतच पार केले. यादरम्यान गिलने ५३ चेंडूंत १०४ धावांची उल्लेखनीय खेळी केली. तो सामन्यानंतर म्हणाला, “प्रसंगाचा विचार करण्याऐवजी चांगले क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मला वाटते जर आपण प्रसंगानुसार खेळले तर आपल्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येते आणि याचबद्दल आम्ही या सामन्यातही बोललो.”
“घरच्या मैदानावर अंतिम सामना खेळण्याबाबतची भावना नक्कीच सुखद आहे. दोन सामन्यांमध्ये केवळ एका दिवसाचाच अवधी आहे. म्हणजेच तयारीसाठी खूपच कमी वेळ उपलब्ध आहे. त्यामुळे, उद्या आम्ही सर्वजण आवश्यक गोष्टी शिकून (सुधारणा करून) आणि शारीरिकदृष्ट्या सावरून घेऊ, अशी आशा आहे. त्यानंतर परवा आम्ही तिथे जाऊ, खेळपट्टीची स्थिती कशी आहे ते पाहू आणि मग नेहमीप्रमाणेच क्रिकेटचा आणखी एक सामना खेळू,” असेही गिल म्हणाला.
“मला असे वाटते की, जर आपण सामन्याच्या ‘महत्त्वाचा’ किंवा त्यावरील दबावाचा विचार न करता केवळ खेळावर लक्ष केंद्रित केले, तर आपल्यातील सर्वोत्तम कामगिरी आपोआपच बाहेर येते. आणि या सामन्यातही आम्ही नेमकी हीच चर्चा केली होती की सामन्यातील ‘गणिते’ किंवा समीकरणे बाजूला सारूया आणि केवळ चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करूया. जोपर्यंत आपण तसे करत राहू, तोपर्यंत सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही तरीही, त्यात काहीच हरकत नाही”, असेही गिलने पुढे म्हटले आहे.
आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात २०२२ आणि २०२५ चे विजेते भिडणार आहेत. रविवारी (३१ मे) अहमदाबादमध्ये हा सामना खेळला जाणार आहे.
Comments are closed.