मुंबई हल्ल्याचा आयएसआयचा कट! दादर परिसराची रेकी, धार्मिक स्थळे आणि विमानतळही टार्गेट; दिल्ली पोलिसांकडून 9 दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र आणि स्फोटकांसह अटक
दिल्ली पोलिसांनी देशातील प्रमुख धार्मिक स्थळे तसेच सरकारी इमारतींवर हल्ल्याचा एक मोठा कट उधळला. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी संबंधित नऊ दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रs, ग्रेनेड तसेच इतर स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानके आणि उद्यानांवर मोठा हल्ला करण्याचा या दहशतवाद्यांचा कट असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या नऊ दहशतवाद्यांनी मुंबईतील दादर रेल्वे स्थानक व जवळपासच्या परिसराची रेकी केली होती. त्यांचा मुंबईसह दिल्लीतील प्रमुख धार्मिक स्थळे, सरकारी इमारती, मंत्रालय आणि सुरक्षा दलांची वेगवेगळी ठिकाणे तसेच गर्दी असलेली ठिकाणे त्यांच्या निशाण्यावर होती. अटक केलेल्यांपैकी ताओकीर रिझवान आणि साजीद मेहबूब शेख हे दोघे मुंबईचे आहेत. इतरांचा दिल्ली आणि पंजाबशी संबंध आहे. तसेच एक जण नेपाळचा नागरिक आहे. अंग कामी लामा असे या नेपाळी नागरिकाचे नाव आहे. याशिवाय लुधियाणातील हरविंदर सिंग, गगनदीप सिंग, मनजीत सिंग या तिघांना अटक करण्यात आली आहे. इतर तिघांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. या आरोपींना ‘आयएसआय’कडून हिंदुस्थानात हल्ले करण्याचे आदेश देण्यात आले होते.
नेपाळच्या दहशतवाद्यावर पैसे पुरविणे तसेच लॉजिस्टीक मदत देण्याची जबाबदारी होती. त्याची यापैकी काही दहशतवाद्यांची बँकॉक येथील तुरुंगात ओळख झाली. तो क्रिप्टो करन्सीमधील तज्ञ होता. त्याने क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पैसा उपलब्ध करून दिला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फंडिंग, भरतीचा पॅटर्न तपासणार
या दहशतवादी मॉडय़ुलला मिळणारा पैसा आणि भरती प्रक्रियेचा तपास दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे. दहशतवादी पाकिस्तानातील शहजाद भट्टी याच्या संपका&त असल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून सूचना मिळत होत्या. तेथील मास्टरमाइंड आणि त्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांचा शोध घेण्यात येत आहे.
मोबाईलमध्ये आढळले मुंबईतील व्हिडीओ
दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडील मोबाईल तपासण्यात आले. त्यात मुंबईतील दादर रेल्वे स्थानक, अणुऊर्जा केंद्र, विमानतळ तसेच इतर संवेदनशील ठिकाणांचे व्हिडीओ आढळले आहेत. याशिवाय दिल्ली व इतर ठिकाणचेदेखील व्हिडीओ आणि छायाचित्रे आढळली आहेत. यावरून दहशतवाद्यांच्या कटाचा अंदाज येत आहे.
Comments are closed.