विधान परिषद निवडणूक – जागावाटपावरून महायुतीत धुसफुस! शिंदे गटाकडून परस्पर अर्ज; सातारा, सोलापूर, रायगडमध्ये गडबड

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने महायुतीमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. भाजप आणि शिंदे गटात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जागांवरून वाद आहे, तर रायगडच्या जागेवर अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. जागावाटप अंतिम झालेले नसताना शिंदे गटातील इच्छुकांनी परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करत थेट बंडाचे निशाण फडकवल्याने सातारा, सोलापूर, रायगडमध्ये महायुतीत गोंधळ उडाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदारात पाडून घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीची वारी केली. यानंतर 17 जागांपैकी 11 जागांवर भाजप, शिंदे गट 4 जागा तर अजित पवार गटाला 2 जागा असा जागावाटपाचा फॉर्म्युला पुढे आला आहे. त्यानंतरही महायुतीत एखाद् दुसरी अधिकची जागा मिळविण्यासाठी शिंदे व अजित पवार गटाचे प्रयत्न सुरू असून कोणती जागा कुणाला सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

सातारा, सोलापुरात बंडाचे निशाण

सातारा-सांगली आणि सोलापूरच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात येत आहे. मात्र शिंदे गटाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी सातारा येथून तर सोलापूरच्या जागेसाठी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे.

जळगावसाठी गुलाबराव पाटील आग्रही

जळगावची जागेसाठी मंत्री गुलाबराव पाटील आग्रही आहेत. येथून ते मुलगा प्रताप पाटील याला उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे, मात्र ही जागा भाजपला सुटल्याचे स्पष्ट होताच गुलाबराव पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी तातडीने मुंबईला दाखल झाले.

अहिल्यानगर उमेदवारीसाठी तनपुरे भाजपमध्ये

विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारणारे प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी त्यांनी हा पक्षप्रवेश केल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघातील अडचणी आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या राजकारणासाठी हा निर्णय घेतला, असे तनपुरे म्हणाले.

नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली

नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाची रस्सीखेच सुरू आहे. त्यातच पक्षांतर्गत चुरस प्रचंड वाढल्याचे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. या दोघांनीही उमेदवारी अर्ज खरेदी करत भाजपकडून जागेसाठी दावा केला आहे.

तटकरेंच्या विरोधात गोगावले, दळवी मैदानात

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ महायुतीत अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. येथून सुनील तटकरे मुलगा अनिकेत याला उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत, मात्र शिंदे गटाकडून अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला विरोध असून मंत्री भरत गोगावले मुलगा विकास गोगावले यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. आमदार महेंद्र दळवी यांनी कन्या जुईली दळवी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत तटकरे यांची डोकेदुखी वाढवली आहे.

Comments are closed.