मुंबई-गोवा महामार्गावर थरार; भरधाव फॉर्च्यूनर चालकाने चार गाड्यांना चिरडले, पोलिसाच्या अंगावरही गाडी घातली, म्हसळ्याच्या दिशेने पळून जाताना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्यूनर चालकाने मुंबई-गोवा महामार्गावर अक्षरशः धिंगाणा घातला. विरुद्ध दिशेने गाडी चालवत त्याने समोरून येणाऱ्या एका गाडीला कट मारली. पुढे तीन ते चार गाड्यांना धडक दिली. इतक्यावरच न थांबता त्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर म्हसळ्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या या सुसाट गाडीचालकावर पोलिसांनी झडप घातली. रेहान उर्फ मोहम्मद रमजान अली हिरानी (२६) असे या माथेफिरू गाडीचालकाचे नाव असून तो गुजरातमध्ये राहतो.

रेहान हिरानी हा गाडीचालक त्याच्या फॉर्च्यूनर कारमधून (जीजे-२३-बीएल-००७२) मुंबईच्या दिशेने निघाला होता. गाडीत त्याची पत्नी व मुलगा याच्यासह आणखी एक पुरुष, महिला व लहान मुलगा हेही होते. ढालघर फाट्याजवळ येताच रेहान हिरानीने महामार्गावरील वन वेमध्ये गाडी घुसवली आणि समोरून वेगाने येणाऱ्या गाडीला त्याने कट मारली. रेहान हिरानीचा हा जीवघेणा स्टंट पाहून समोरून येणाऱ्या गाडीचालकाने गाडी वळवली. त्याने रेहान हिरानी याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु सुसाट गाडी चालवत रेहानने माणगावच्या अरुंद रस्त्यावर आणखी तीन ते चार गाड्यांना धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस दीपक शेरकर यांना दिसली. शेरकर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने शेरकर यांना चिरडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. शेरकर यांनी वेळीच सुरक्षित बाजूला उडी मारल्याने त्यांचे प्राण सुदैवाने बचावले.

जमावाच्या पाठलागामुळे दिशा बदलली

फॉर्च्युनर चालक रेहान हिरानी याचे हे भयंकर कृत्य पाहून जमाव खवळला. चार ते पाच कारचालकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेहान हिरानीने भरधाव गाडी म्हसळा रोडला वळवली, परंतु तेथेही पाठलाग करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.