‘ऑपरेशन सिंदूर’ संपले नाही म्हणता, मग ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ आलं कुठून? निवडणुकांची तयारी सुरू आहे का? – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही. जोपर्यंत दहशतवादाचा पूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू राहील असे देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ आले कुठून? याचा अर्थ लोकसभा आणि इतर निवडणुकांची तयारी सुरू आहे का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप सुरूच आहे. सध्या तात्पुरता युद्धविराम दिला असला तरी आवश्यकता भासल्यास ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ साठी हिंदुस्थान लष्कर, तिन्ही संरक्षण दले पूर्णपणे सज्ज आहेत, असा सज्जड इशारा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला नाव न घेता दिला. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

‘सिंदूर 2.0’ साठी लष्कर सज्ज, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कडक इशारा

संजय राऊत म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ साठी आपण सज्ज आहोत ही चांगली गोष्ट आहे. पण पाकिस्तानला अशा प्रकारचा इशारा द्यावा अशा कारवाया देशामध्ये घडत आहे का, हे सुद्धा जनतेला विश्वास घेऊन सांगणे गरजेचे आहे. अद्याप ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही. जोपर्यंत दहशतवादाचा पूर्ण बिमोड होत नाही तोपर्यंत ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू राहील असे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केल्यावर हे ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ आले कुठून?

आंतरराष्ट्रीय दबावामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ अर्धवट सोडून आपण मागे आलेलो आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’चा मुख्य उद्देश पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेणे हा होता. मग आधी ‘ऑपरेशन सिंदूर’नुसार पीओके ताब्यात घ्या. 1948 मध्ये पाकिस्तानने कब्जा केलेले बलुचिस्तान, गिलगित बाल्टिस्तान हे प्रांत ताब्यात घेण्याचे ध्येय ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये होते. या सगळ्यावर अद्यापर कारवाई झालेली नाही आणि लष्करप्रमुख ‘ऑपरेशन सिंदूर 2.0’ ची घोषणा करतात. याचा अर्थ लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे का? कारण असे काही घडले की आम्हाला निवडणुका येतात असे आम्हाला वाटते. देशाला यातून काही दिशा मिळणार असेल, देशाचा भूगोल वाढणार असेल तर त्याचे स्वागत करू, असेही संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.