पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला हरताळ; मंत्री संजय राठोड यांचा हेलिकॉप्टर दौरा चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले असताना राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टर दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला मंत्र्यांकडून हरताळ फासला जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. राठोड यांनी बंजारा विरासत संग्रहालय तसेच विविध विकासकामांच्या पाहणीसाठी त्यांनी हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे भेट दिली.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी मोठा वाहनताफा तैनात करण्यात आला होता. यामध्ये अनेक शासकीय तसेच खासगी वाहनांचा समावेश असल्याची चर्चा आहे. पोहरादेवी येथे विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री राठोड हे पुढील कार्यक्रमासाठी यवतमाळकडेही हेलिकॉप्टरने रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यावरून विरोधकांकडून तसेच काही सामाजिक माध्यमांवर खर्च आणि इंधन वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत खर्चाचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या दौऱ्यावरील खर्च आणि हेलिकॉप्टर वापराची आवश्यकता याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमध्ये वेळेचे नियोजन आणि सुरक्षा हे महत्त्वाचे घटक असले तरी सार्वजनिक खर्चाच्या पारदर्शकतेबाबतही नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.