Chandrapur crime news – व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून विवाहितेची गळा चिरून हत्या; 8 तासांत प्रियकर गजाआड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी माहेरी आलेल्या 36 वर्षीय शितल रणधीर कुंभारे या विवाहितेची घरात घुसून गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत (क्वॉर्टर क्र. 52/2) घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत केवळ 8 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली आहे. राजेश अट्टेला (वय – 35, रा तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे.

मृतक शितल कुंभारे या काही दिवसांपूर्वीच आपल्या लहान मुलीसह धोपटाळा येथील माहेरी आल्या होत्या. घटनेच्या रात्री शितल यांची आई आणि भाऊ देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात केवळ शितल आणि त्यांची लहान मुलगी अशा दोघीच होत्या. रात्रीच्या वेळी मुलगी दुसऱ्या खोलीत झोपलेली असताना आरोपी राजेशने घरात प्रवेश केला आणि गाढ झोपेत असलेल्या शितल यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा गळा चिरला. या क्रूर हल्ल्यात शितल यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी लहान मुलगी जागी झाल्यानंतर हा रक्ताळलेला थरार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. अवघ्या 8 तासांत पोलिसांनी आरोपी राजेश अट्टेला याला ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत आरोपी राजेशने आपला गुन्हा कबूल केला असून हत्येमागचे कारण सांगितले. मृतक शितल आणि आरोपी राजेश हे एकाच गावातील असून त्यांचे बालपणापासून प्रेमप्रकरण होते. मात्र, काही दिवसांपूर्वी शितलने राजेशला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले होते. तसेच ती दुसऱ्या मुलांसोबत बोलते असा संशय राजेशला होता. याच रागातून आणि संशयातून त्याने थेट तेलंगणातून येत शितल हिची झोपेतच निर्घृण हत्या केली.

तांत्रिक बाबी आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अवघ्या 8 तासांत अटक केली आहे. आरोपीने जुन्या प्रेमसंबंधातून आणि संशयातून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे.

अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

सदर कारवाई चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा व त्यांच्या पथकाने केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार असून राजुरा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.