रायगडावर पुरातत्व खात्याची मोगलाई; पर्यटकांकडून वसुली, पण सुविधांची बोंब, स्वच्छतागृह कुठे आहे सांगा? महिलेच्या प्रश्नाने अधिकारी निरुत्तर
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याची कोट्यवधी रुपये खर्चुन सध्या डागडुजी सुरू आहे, पण प्राथमिक सुविधांच्या नावाने बोंब असून पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहदेखील नाही. सध्या असलेल्या पाच स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असून ती बंद आहेत. त्यामुळे महिलांची अतिशय गैरसोय होत असून पुरातत्व विभागाची रायगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्रत्येकी २५ रुपये खुलेआम वसुली मात्र सुरू असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. स्वच्छतागृह कुठे आहे सांगा.. आम्ही वॉशरूमला जायचे तरी कुठे? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला, पण अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पुरातत्त्व खात्याच्या मोगलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रायगडावर छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध भागात दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिवभक्त तसेच पर्यटक येतात, परंतु त्यांना आवश्यकता असलेल्या सुविधा मिळत नाहीत. पुण्यातील अॅड. अर्चना मारणे हे त्यांचे सहकारी लौकीक गोळे यांच्यासह रायगड किल्ल्यावर आले होते, पण त्यांना अतिशय विदारक अनुभव आला. किल्ल्यावर पाच वॉशरूम आहेत. मात्र पाण्याअभावी ते बंद असून त्यांची कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे या वॉशरूमला चक्क टाळे ठोकले आहे. त्यामुळे महिलांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमचे पैसे जातात कुठे?
हा प्रकार बघून अर्चना मारणे या कमालीच्या संतप्त झाल्या. तसेच त्यांनी थेट पुरातत्व विभागाचे कार्यालय गाठून तेथील अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारला. तुम्ही प्रत्येक पर्यटकाकडून २५ रुपये घेता, मग त्यांना वॉशरूम व अन्य प्राथमिक सुविधा देण्याचे काम कुणाचे आहे ? पर्यटकांनी दिलेले पैसे जातात कुठे? रायगड हा फक्त किल्ला नाही तर पवित्र मंदिर आहे. आम्हाला रायगडाच्या मानसन्मानाची चिंता आहे. झोपडपट्ट्यांमध्येदेखील प्रसाधनगृहे आहेत. मग किल्ल्यावर सुविधा देण्याचे काम कुणाचे आहे? असे प्रश्न अधिकाऱ्यांना मारणे यांनी विचारले.
Comments are closed.