थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा पालिका लिलाव करणार, मूल्यांकनासाठी संस्थेची नियुक्ती
थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा महापालिका प्रशासनाकडून लिलाव करण्यात येणार आहे. यात जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये भूखंड व इमारतींचा समावेश असून त्यांच्या मूल्यांकनासाठी महापालिकेकडून संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेसाठी महापालिकेने 21 लाख 67 हजार 299 रुपयांची तरतूद केली आहे.
अनेकदा नोटीस बजावूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर बडगा उगारत महापालिकेने जप्तीची कारवाई केली. महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागांमधील थकीत करवसुलीसाठी संबंधित मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र लिलावापूर्वी मालमत्तेचे अचूक बाजारमूल्य निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनमान्य मूल्यांकन संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी ‘मे. सूर्या टेक व्हॅल्युअर्स अँड बिल्डिंग कन्सल्टंट’ या संस्थेची निवड केली आहे.
प्रत्यक्ष पाहणीसह तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन
‘मे. सूर्या टेक व्हॅल्युअर्स अँड बिल्डिंग कन्सल्टंट’ संस्था 24 विभागांतील थकीत मालमत्ता कर असलेल्या भूखंड व इमारतींचे प्रत्यक्ष पाहणीसह तांत्रिक आणि आर्थिक मूल्यांकन करणार आहे. मूल्यांकन अहवालाच्या आधारे संबंधित मालमत्तांची राखीव किंमत निश्चित करण्यात येईल आणि त्यानंतर लिलावाची प्रक्रिया राबविली जाईल, असे मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून सांगण्यात आले.
Comments are closed.