वाढत्या उष्णतेबाबत सावधानता बाळगा!

पंतप्रधानांची ‘मन की बात’ : कोकम सरबत अन् सोलकढीचाही उल्लेख

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 31 मे रोजी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 134 व्या भागात राष्ट्राला संबोधित केले. भारतातील विविध भागांमध्ये तापमानात झालेल्या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी आपल्या अलीकडील परदेश द्रौयांचाही उल्लेख केला.

पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये उष्णतेबद्दल भाष्य करताना ‘आपल्या देशात उकाड्याचा सामना करण्याचा मार्ग अनेकदा स्वयंपाकघरातच सापडतो.’ असे सांगितले. जसा उकाडा वाढतो, तशी घरच्या जेवणाची चव बदलते. तुम्ही स्थानिक पेयांशी परिचित आहात. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात, तर तुम्हाला आम पन्ना मिळेल, जो एक स्वादिष्ट कच्चा आंबा असून उकाड्यापासून आराम देतो. पंजाब आणि हरियाणात गेल्यावर लस्सी मिळेल. राजस्थान आणि गुजरातमध्ये ताक प्रत्येक जेवणाचा सोबती असतो. बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात सत्तू सरबत तर अप्रतिमच असते. ते पोट भरते आणि शक्ती देते. कोकण आणि गोव्यात कोकम सरबत आणि सोलकढी आहे. दक्षिण भारतात, पानकम, नीर मोर, सांबारम आणि ओडिशामधील बेल पन्नाही केवळ पेये नाहीत, तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा भाग आहेत, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्र आणि कोकणातील हापूस आंबा आणि गुजरातमधील केशरहे आंब्याच्या रसाचा आस्वाद घेण्याचा सल्लाही पंतप्रधानांनी दिला. याप्रसंगी त्यांनी आंबा उत्पादनात गुंतलेल्या शेतकरी बंधू-भगिनींचे कौतुक केले. तुम्ही केवळ सामान्य शेतकरी नाही, तर देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही खूप विशेष आहात, असे मोदी म्हणाले.

चोल राजघराण्यातील ताम्रपट नेदरलँडमधून परत आले

अलीकडेच मला नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. चोळ काळातील प्राचीन ताम्रपट एका विशेष समारंभात भारतात परत आणण्यात आले. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून संदेश येत आहेत. लोक आपला आनंद व्यक्त करत आहेत. या ताम्रपटांविषयी खूप उत्सुकताही आहे. यामध्ये 21 मोठे आणि तीन लहान ताम्रपटांचा समावेश आहे. या ताम्रपटांमध्ये चोळ राजवंशाच्या कामगिरीचेही वर्णन आहे. हे शिलालेख 1,000 वर्षांहून अधिक जुने आहेत. हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषांमध्ये लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन, धर्म आणि संस्कृतीबद्दल महत्त्वाची माहिती मिळते, असेही पंतप्रधानांनी ‘मन की बात’मधून सांगितले.

Comments are closed.