ज्येष्ठ गायिका 'पद्मभूषण' सुमन कल्याणपूर यांचे निधन

भावगीतांची सम्राज्ञी हरपली : संगीत क्षेत्रावर शोककळा

टी. भा. प्रतिनिधी

मुंबई

आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका ‘पद्मभूषण’ सुमन कल्याणपूर यांचे रविवार, 31 मे रोजी निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाल्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. सुमनजींनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत.

मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारे आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांचा ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. अलिकडेच त्यांना पुलस्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कारही प्राप्त झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांनी संगीताचा अतिशय कसून आणि सखोल अभ्यास केला होता.

मराठी संगीत क्षेत्रात सुमनताईंचे बहुमूल्य योगदान आहे. जुन्या पिढीतील मंडळी असो वा नवोदित तरुण, आजही त्यांची गाणी प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळताना दिसतात. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. रुपेरी पडद्यावरचे सुमन कल्याणपूर यांचे पहिले गाणे ‘कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे’ हे होते. या गाण्याने रसिकांना त्यांच्या आवाजाची भुरळ पाडली. त्या जरी शुद्ध शास्त्राrय संगीत आणि नाट्यासंगीताकडे फारशा वळल्या नाहीत, तरी त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्राrय बैठक होती. त्यांनी गायलेल्या ‘मन मोहन मन मे हो तुम्ही’ या अजरामर गीताला मानाचा ‘तानसेन पुरस्कार’ लाभला होता.

बांगलादेशात जन्म

सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील (तत्कालीन अविभाजित भारत) भवानीपूर येथे झाला होता. सुमनजींचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत ‘सुमन हेमाडी’ या नावानेच गाणी गात होत्या. पुढे त्याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली.

गझलसम्राट तलत महमूद यांनी ओळखला आवाज

सुमन कल्याणपूर यांचा सिनेसृष्टीतील प्रवेश अत्यंत रंजक होता. त्यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात गाणे गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वत:च्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला होकार देताच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला.  मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली होती.

लोकप्रिय चित्रपट गीते:

जिथे सागरा धरणी मिळते

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात

माहेरी जाऊन स्वसाची बरसावी.

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

कशी गवळण राधा बावरली

नाविका रे वारा वाहे रे

केतकीच्या बनी तेथे नाजला ग मोर

उठा उठा चिऊताई

 

गाजलेली भावगीते आणि भक्तीगीते:

अक्रुरा नको नेऊ माधवा

आकाश पांघरुनी

केतकीच्या बनी तिथे

केशवा माधवा

जुळल्या सुरेल तारा

जेथे जातो तेथे

नकळत सारे घडले

वाट इथे स्वप्नातील

शब्द शब्द जपुनी

Comments are closed.