सुवर्णपदक विजेता चिराग त्यागीची हत्या

साथीदारानेच गोळ्या झाडल्याचे उघड : उत्तर प्रदेशमधील घटनेने संतापाचे वातावरण

वृत्तसंस्था/ गाझियाबाद

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेता पॅरा-अॅथलीट चिराग त्यागीची (24) गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून संशयित आरोपीला अटक केली आहे. ही घटना दोन पॅरालिम्पिक खेळाडूंमधील वैमनस्यातून घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

चिराग त्यागी याचा मृतदेह गाझियाबादच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई उपवनमध्ये आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार, तो सकाळी दिल्लीतील आपल्या वसतिगृहातून मुरादनगरमधील त्यांच्या मूळ गावी, बसंतपूर सैतली येथे जात असताना हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्या पाठीवर एक छिद्र आढळून आले, परंतु ते गोळीमुळे झाले की इतर कोणत्या वस्तूमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक पथके सर्व बाबींचा तपास करत आहेत.

संशयित आरोपीला अटक

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीचे नाव यश खाटिक असे आहे. चौकशीदरम्यान यश खाटिकने गुह्याची कबुली दिली. तो चिराग त्यागीसोबत प्रशिक्षण घेत असे आणि दोघेही अंध गटात अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेत असत. सूड म्हणून त्याने चिराग त्यागी यांची गोळ्या झाडून हत्या केली. कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान चिराग त्यागी याने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे त्याची पात्रता रद्द झाली होती. या घटनेमुळे तो खूप व्यथित झाल्याने त्याने चिराग त्यागी यांची गोळ्या झाडून हत्या केली, असे डीसीपी धवल जयस्वाल यांनी सांगितले.

Comments are closed.