Dapoli News – ऐन खरीप हंगामात दापोलीत पशुधन सेवेचा बोजवारा

पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदांमुळे ऐन खरीप हंगामातच पशुधन सेवेचा पार बोजवारा उडाला आहे. त्यामुळे दापोलीतील शेतकऱ्यांना आपल्या पाळीव प्राण्यांसह पशूंच्या औषधोपचारासाठी खाजगी पशुवैदयकांची मदत घ्यावी लागत आहे.

दापोली तालुक्यातील 178 महसुली गावांसाठी शहरात असलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयासह आसुद, बुरोंडी, गावतळे, कुडावले, माटवण, महाळूंगे, पंचनदी, सोंडेघर, विसापूर, दाभोळ, केळशी, आंजर्ले, दाभिळ,वाकवली आणि पालगड असे एकूण 16 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या 16 पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी एकुण 36 पदे मंजूर आहेत मात्र त्यातील तब्बल 24 पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे पशू वैद्यकीय दवाखाने बंद पडले आहेत. त्यामुळे गावागावातील शेतकऱ्यांना आपल्या पाळीव प्राण्यांना दापोली शहरात तालूक्याच्या ठिकाणी उपचारासाठी आणणे हे वेळेचे अपव्यय करणारे आहेच शिवाय आर्थिकदृष्ट्या परवडणारे देखील नाही.

दापोली तालुक्यासाठी दापोली शहरात तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आहे या चिकित्सालयासाठी एकुण 5 पदे मंजूर आहेत त्यातील 1 पद हे रिक्त आहे तर प्रत्येकि 2 पदे मंजूर असलेल्या आसुद ,बुरोंडी , कुडावले ,माटवण , महाळूंगे , पंचनदी, सोंडेघर , विसापूर आणि पालगड या 9 ठिकाणच्या पशू वैद्यकीय दवाखान्यात दोन्हीही पदे रिक्तच असल्याने हे सगळे दवाखाने बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. तर गावतळे , केळशी ,आंजर्ले,दाभीळ येथे मंजूर दोन पदांपैकी प्रत्येकी एक पद रिक्त आहे. फक्त वाकवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्व मंजूर पदे भरल्याचा अपवाद वगळता तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदांमुळे शेतकऱ्यांना आपल्या पाळीव प्राण्यांसह पशुंवर उपचार करण्यासाठी मोठीच अडचण निर्माण झाली आहे.

तालूका ठिकाणांपासून अनेक गावे ही कोसो दूर आहेत त्यामुळे तेथे असलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात पशू पक्षी आणि पाळीव प्राण्यांना उपचारासाठी घेऊन जाणे हे वाहन भाड्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसते. शिवाय ये जा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेळेचा अपव्यय करणारे असते त्यामुळे दापोलीत एकुणच मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने तेथील दवाखाने पुर्णपणे बंद आहेत . त्यामुळे दवाखान्याच्या इमारती पडक्या झालेल्या आहेत. ही परिस्थिती केवळ आताच उद्भवली आहे असे नाही तरीसुध्दा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही समस्या सोडविण्यासाठी ना लोकप्रतिनिधींनी लक्ष ‌ दिले नाही प्रशासनाने त्यामुळे ऐन खरीप हंगामातच शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जात नाही हा सजग सरकारच्या कृतिशीलपणाचा नाकर्तेपणा म्हटला तर ते अजिबातच चुकीचे ठरणार नाही

Comments are closed.