शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला आग लागली की लावली गेली? हे सत्य समोर यायला हवे! रोहित पवार यांची मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवी दिल्लीतील आयटीओ (ITO) परिसरातील विकास मार्गावर असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाच्या आवारात अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या कार्यालयाला ही आग लागली की ती जाणीवपूर्वक लावली गेली, हे सत्य समोर यायला हवे, अशी थेट मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. NEET, CBSE 12 वी आणि CUET (UG) यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाला असून देशातील जवळपास 45 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला आहे. हा सगळा प्रकार करणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे काळे कारनामे दडपण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना, असा संशय आता विद्यार्थ्यांकडून विचारला जात असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे बोलताना रोहित पवार यांनी केंद्र सरकारकडे आग्रही विनंती केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेतली जावी. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि संबंधित परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’मधील (NTA) सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

Comments are closed.