Khed News – फळसोंडा येथे गाईला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू
तालुक्यातील फुरूस गावाला पोयनारशी जोडणाऱ्या रस्त्यावर फळसोंडा जामा मशीद परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात विकास चिखलकर (वय ५९, रा. सुतारवाडी, फुरूस) यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास चिखलकर हे ३० मे रोजी त्यांच्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून (एमएच ०८ ए ०७४१) पाणी आणण्यासाठी फुरूसच्या दिशेने जात होते. फळसोंडा जामा मशीद परिसरात पोहोचताच अचानक एक गाय रस्त्यावर आल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या धडकेत चिखलकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेमुळे चिखलकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून फुरूस आणि परिसरात शोककळा पसरली आहे. विकास चिखलकर हे मनमिळावू आणि सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्या निधनाबद्दल ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दरम्यान, या अपघातानंतर फुरूस–पोयनार मार्गावरील वाढत्या अपघातांच्या घटनांबाबत ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या मार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता फळसोंडा मोहल्ल्यातील दाट वस्तीमधून जात असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
याशिवाय परिसरात मोकाट जनावरांचे वाढते प्रमाणही चिंतेचा विषय बनले आहे. यापूर्वीही भटक्या जनावरांमुळे या मार्गावर अनेक अपघात घडल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विकास चिखलकर यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे रस्ते सुरक्षा, वाहनांचा वेग आणि मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.