Satej Patil Got Angry “अन्यथा आमची सत्ता असलेल्या ग्रामपंचायती वेगळा निर्णय घेतील” जि.प निधी वाटपावरुन सतेज पाटील

जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्तआयोगांतर्गत येणारा निधी हा लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्राच्या निकषानुसार मिळत असल्याने त्याचे वाटपही त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे , आणि जर असे होत नसेल तुम्ही राजकारण करुन आमच्यावर अन्याय करणार असाल तर आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. मंगळवारी कोल्हापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जसमिन यांच्याशी झालेल्या चर्चेत आमदार सतेज पाटील यांनी थेट सूचना केल्या.

सतेज पाटलांचा थेट इशारा

“तुम्ही जर निधीवाटपाच्या कामात अन्याय करणार असाल तर आमची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतींनी सेसवरुन वेगळा निर्णय घेतल्यास त्याचा राज्यात वेगळा संदेश जाईल एवढी दखल घ्या” असा थेट इशाराच यावेळी डॉ. जसमिन यांच्याशी चर्चा करताना आमदार सतेज पाटील  यांनी दिला. यावेळी तुम्हाला ४० सदस्यांचा विकास करायचा आहे की संपूर्ण जिल्ह्याचा याचेही उत्तर द्या असेही आमदार सतेज पाटील यांनी डॉ. जसमिन यांना सुनावले.

१५ व्या वित्त आयोगाच्या ८२ कोटींच्या निधीवाटपावरुन  सध्या कोल्हापूर जिल्हापरिषदेत घमासान सुरु आहे. ६०; ४० असे निधीवाटप करावे असे ठरले होते पण पदाधिकाऱ्यांनी या वाटपाला नकार दिला आणि जिल्हापरिषदेत संघर्ष सुरु झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी थेट सतेज पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चर्चा केली.

याबाबतीत यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना लवकरात लवकर तोडगा काढावा अशा सूचना देऊनही पदाधिकारी ऐकत नसल्याने सतेज पाटील यांनी स्वत: जिल्हापरिषदेत जाण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला त्यांच्यासोबत आमदार जयंत आसगावकर, सदस्य एकनाथ पाटील, अभिजीत तायशेटे, अमर पाटील, अर्चना चौगुले, सुदर्शन खोत, राहुल देसाई संभाजी पाटणकर इत्यादी होते.

आमदार सतेज पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर डॉ. जसमिन यांनी मी याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देतो पण हा विषय सर्वसाधारण सभेतच चर्चिला जाईल असे सांगताच आमदार सतेज पाटील यांनी मग आमची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आहेत तिथे आम्ही भेदभाव करत नसू तर तुम्ही का करता? असा प्रश्न विचारला.

Comments are closed.