अन्नामलाई यांच्या राजीनाम्यावर अनिश्चितता कायम आहे
अमित शाह तसेच भाजप अध्यक्षांची घेतली भेट : लवकरच घेणार पत्रकार परिषद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली आहे. अण्णामलाई हे भाजपमधून बाहेर पडत नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा जोर पकडू लागली असताना अमित शाह यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत काय घडले याची अधिकृत माहिती मात्र समोर येऊ शकलेली नाही. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी न बोलताच अण्णामलाई तेथून रवाना झाले.
अण्णामलाई यांनी भाजप अध्यक्ष नितिन नवीन आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी.एल. संतोष यांचीही भेट घेतली. नवीन यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा अण्णामलाई यांनी राजीनामा सोपविला असल्याचा दावा आहे, परंतु भाजपकडून याची पुष्टी करण्यात आलेली नाही. अण्णामलाई यांनी अद्याप औपचारिक राजीनामा दिला नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
भाजप नेतृत्वावर नाराज?
तामिळनाडू भाजप अध्यक्ष पदावरून हटविण्यात आल्यावर अण्णामलाई हे पक्ष नेतृत्वावर नाराज झाल्याचे बोलले जात आहे. याचबरोबर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि अण्णामलाई यांच्यात पुन्हा आघाडी झाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. या निर्णयांनंतर ते पक्षनेतृत्वापासून अंतर राखले होते असे मानले जाते.
नवा पक्ष स्थापण्याची तयारी
अण्णामलाई हे नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा तामिळनाडूत सुरू आहे. अलिकडेच पार पडलेली विधानसभा निवडणूक त्यांनी स्वत: लढविली नव्हती. कोइम्बतूर येथील एखाद्या मतदारसंघात त्यांनी उभे रहावे अशी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा होती, परंतु त्यांनी स्वत: निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच त्यांच्या राजकीय भविष्यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. याचमुळे ते आता नवा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.
भाजपसाठी झटका ठरणार
अण्णामलाई यांना तामिळनाडूत भाजपचा आक्रमक आणि लोकप्रिय चेहरा मानले जाते. त्यांच्या नेतृत्वात पक्षाने राज्यात स्वत:ची उपस्थिती बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी पक्ष सोडल्यास हा भाजपसाठी मोठा राजकीय झटका ठरू शकतो. खासकरून तामिळनाडूत भाजप स्वत:ची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना अण्णामलाई यांनी पक्ष सोडल्यास मोठा झटका बसू शकतो.
लवकरच भूमिका स्पष्ट करणार
तामिळनाडू आणि राष्ट्रीय राजकारणाची नजर आता अण्णामलाई यांच्या पुढील पावलावर लागून राहिली आहे. अण्णामलाई हे पुढील दोन दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेत स्वत:ची भूमिका स्पष्ट करू शकतात. अशास्थितीत ते भाजपमध्येच राहणार का तामिळनाडूच्या राजकारणात नवा मार्ग निवडणार हे पहावे लागणार आहे.
Comments are closed.