मुंबईतील 82 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे हक्क संरक्षित करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने (म्हाडा) नुकत्याच जाहीर केलेल्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात 82 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. म्हाडाने 30 मे 2026 रोजी ही यादी प्रकाशित केली असून तेव्हापासून या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईतील ८२ जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारती म्हाडाकडून ‘अतिधोकादायक’ घोषित करण्यात आल्या आहेत. ह्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना पत्र लिहून तेथील रहिवाशांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.@mhadaofficial @CMOMaharashtra… pic.twitter.com/qyC9kIqVY1
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 3 जून 2026
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात तेथील नागरिकांच्या हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त केली आहे. या सर्व अतिधोकादायक इमारतींमध्ये अनेक खोलीधारक गेल्या अनेक वर्षांपासून आणि पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास आहेत. मात्र, इमारत अतिधोकादायक घोषित झाल्याचा गैरफायदा घेऊन काही जागामालक रहिवाशांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. रहिवाशांना जबरदस्तीने इमारतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न जागामालकांकडून होऊ शकतो, तसेच प्रशासनाकडूनही त्यांच्याविरुद्ध निष्कासनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
या गंभीर परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. या सर्व इमारतींमधील मूळ रहिवाशांची योग्य नोंद करण्यात यावी. त्याचप्रमाणे, ऐन पावसाळ्यात या नागरिकांच्या जीवितास व जीवनमानास कोणताही धोका निर्माण होणार नाही याची खात्री राज्य सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या हक्काच्या घरांवरून रहिवाशांना बेघर केले जाऊ नये आणि त्यांचे घरांवरील कायदेशीर हक्क पूर्णपणे संरक्षित राहावेत, यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
म्हाडाने जाहीर केली अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी, दक्षिण मुंबईतील 82 इमारती कधीही कोसळतील!
Comments are closed.